नागपूर : पॅरिसमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भंडाऱ्याची ज्योती गदेरिया सायकलिंगच्या दोन क्रीडा प्रकारांत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. विशेष म्हणजे, पॅरालिम्पिकमध्ये भारतातर्फे प्रथमच सायकलपटू सहभाग घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्योती गदेरियासह हैदराबादचा शेख अर्शद या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करेल. ज्योती ही मूळची भंडारा जिल्ह्यातील डोंगरगावची आहे. २६ वर्षीय ज्योती पॅरिस स्पर्धेत पॅरा-रोड सायकलिंग आणि पॅरा-ट्रॅक सायकलिंग या दोन क्रीडा प्रकारांत आपले कौशल्य दाखवणार आहे.

हेही वाचा >>> विक्रमी कामगिरीचे भारताचे उद्दिष्ट! पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून प्रारंभ

ज्योतीचा भंडारा ते पॅरिसचा प्रवास फार खडतर राहिला आहे. सुरुवातीच्या काळात ती कबड्डी खेळाडू होती. २०१६ साली झालेल्या भीषण अपघातात तिला डावा पाय गमवावा लागला. या अपघातामुळे दोन वर्षे ती नैराश्यात राहिली, पण तिने हार न मानता पुन्हा क्रीडाविश्वात पाऊल ठेवण्याचे ठरवले. सुरुवातीला तिने पॅरा-रोईंग स्पर्धेत सहभाग घेतला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक प्राप्त केले. यानंतर ज्योती सायकलिंगकडे वळली.

ज्योतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर १२ पदके मिळवली. या कामगिरीनंतर तिला शासकीय मदतीची अपेक्षा होती, पण ती मिळाली नाही. हैदराबादच्या एका खासगी संस्थेच्या मदतीने ज्योतीने सराव सुरू ठेवला आणि पॅरालिम्पिकपर्यंत मजल मारली. २०२२ मध्ये झालेल्या पॅरा-आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यावर ती पॅरिस पॅरालिम्पिकसाठी पात्र ठरली.

पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणे ही अवघड गोष्ट असली, तरी मी सर्वोत्तम कामगिरी करून देशासाठी पदककमाई करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. माझ्या क्रीडा प्रकारात १६-१७ महिला खेळाडू आहेत. त्यामुुळे ही स्पर्धा फार कठीण होणार आहे. – ज्योती गदेरिया, पॅरा-सायकलपटू.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jyoti gaderiya represent india in two sports of cycling at the paralympic games zws