सध्या जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांसाठीची पर्वणी अर्थात विश्वचषक चालू आहे. या स्पर्धेमध्ये जसे काही प्रबळ दावेदार काही सहज विजय साकार करत आहेत, तसेच काही खमके संघ दुबळ्या संघांकडून पराभूत होत आहेत. नेदरलँड्सनं दक्षिण आफ्रिकेला नमवत मिळवलेला विजय अशाच श्रेणीतला होता. दुसरीकडे भारतीय संघानं आत्तापर्यंत स्पर्धेतली आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. गुरुवारी बांगलादेशशी झालेल्या सामन्यात भारतानं तब्बल सात विकेट्स राखून मोठा विजय मिळवला. या सामन्याचा स्टार ठरला तो किंग कोहली! मात्र, त्याच्यासोबत शेवटपर्यंत मैदानावर तळ ठोकून उभा असलेला के. एल. राहुल चाहत्यांची मनं वेगळ्याच कारणासाठी जिंकून गेला!

गुरुवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशनं टॉस जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निरणय घेतला. भारतासमोर त्यांनी विजयासाठी २५७ धावांचं आव्हान ठेवलं. प्रत्युत्तरादाखल भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा शुबमन गिल यांनी तडाखेबाज सुरुवात करून दिली. त्यावर पुढे विराट कोहली आणि के. एल. राहुल यांनी विजयाचा कळस चढवला. यामध्ये विराट कोहलीनं त्याच्या कारकिर्दीतलं ४८वं एकदिवसीय शतक झळकावलं. त्यामुळे विराट कोहलीचं सर्वत्र कौतुक होत असताना त्याचं काही अंशी श्रेय के. एल. राहुललाही दिलं जात आहे.

नेमकं काय घडलं?

सामन्यामध्ये एक वेळ अशी होती की भारताला विजयासाठी २८ धावा हव्या होत्या आणि विराट कोहली तेव्हा ७३ धावांवर खेळत होता. समोर के. एल. राहुलही तिशीच्या धावसंख्येवर होता. त्यामुळे एकीकडे राहुलला अर्धशतक पूर्ण करण्याची संधी होती, तर दुसरीकडे विराटला शतक करण्याची! पण राहुलनं जवळपास पुढचा सगळा सामनाच विराटच्या हाती सोपवला. मग विराटनं समोरच्या बाजूनं फटकेबाजी करत उरलेल्या धावा लवकरात लवकर पूर्ण करायला सुरुवात केली.

राहुलचं औदार्य, विराटचं बहुमोल कार्य!

विराट समोर खेळत असताना के. एल. राहुलनं जवळपास प्रेक्षक म्हणूनच भूमिका निभावायचं ठरवलं होतं. विराटचं शतक पूर्ण व्हावं हीच तमाम भारतीयांप्रमाणेच त्याचीही इच्छा होती. शेवटी शेवटी तर एकेरी धावा काढायलाही राहुल थेट नकार देत विराटलाच जास्तीत जास्त खेळण्याची संधी कशी मिळेल, याची काळजी घेत होता. त्यासंदर्भात बोलताना के. एल. राहुलनं सामन्यानंतर यावर प्रतिक्रिया दिली.

IND vs BAN: पुण्यनगरीत कोहलीचे ‘विराट’पर्व! ४८ व्या शतकासाठी पंचांची मदत?

“मी त्याला तेव्हा एकेरी धाव घ्यायला नकार दिला. तेव्हा विराट कोहली मला म्हणाला की जर तू असं केलंस, तर लोकांना वाटेल मी माझ्या वैयक्तिक कामगिरीसाठी खेळतोय. पण मी त्याला सांगितंल की आपण हा सामना अगदी सहज जिंकतोय. तू तुझं शतक पूर्ण कर”, असं के. एल. राहुलनं सामन्यानंतर सांगितलं. त्यानंतर विराटनं शेवटच्या धावेसाठी षटकार ठोकत आपलं ४८वं शतक साजरं केलं!