कबड्डी दिनाच्या निमित्ताने कोल्हापूरचे माजी राष्ट्रीय खेळाडू कल्लप्पाण्णा आवाडे यांना कबड्डी भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. मधुसुदन पाटील पुरस्कारासाठी मुंबई उपनगरच्या नितीन मोरेची तर अरुणा साटम पुरस्कारासाठी पुण्याच्या स्नेहल शिंदेची निवड झाली आहे. कबड्डी महर्षी शंकरराव तथा बुवा साळवी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कबड्डी दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे १५ जुलैला कोल्हापूर येथे राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, अमृतकलश आणि रोख १०,००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
हूलचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीताराम शिंदे यांच्यासह हिंदूराव कोंदळे आणि आनंद गंभीर यांना तर महिलांमध्ये जयश्री वर्तक, विद्या आपटे, वत्सला कदम यांची ज्येष्ठ खेळाडू पुरस्कारासाठी निवड झाली आहे. अनंत शेळके यांना ज्येष्ठ प्रशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कबड्डीच्या सर्वागीण वृत्तांकनाकरता औरंगाबादच्या प्रमोद माने आणि कोल्हापूरच्या संजीव खाडे या क्रीडा पत्रकारांना गौरवण्यात येणार आहे.
प्रा. संभाजी पाटील, प्रा. विजय पाथ्रीकर, विलास शिंदे, मोहन गायकवाड, लीलाताई केळकर या पाचसदस्यीय निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली.