प्रशांत केणी, लोकसत्ता
मुंबई : अस्लम इनामदारने २०११मध्ये कबड्डी खेळायला प्रारंभ केला. तेव्हा वडिलांच्या निधनामुळे कुटुंबाची स्थिती हलाखीची होती. पण जिद्दीने खेळत त्याने पुणेरी पलटणकडून प्रो कबड्डी लीगचा गतहंगाम गाजवला. यंदाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या उपविजेतेपदाचा शिल्पकार ठरलेला अस्लम आगामी प्रो कबड्डी लीग आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज होतो आहे. कबड्डीमुळे आयुष्य पालटल्याचे तो आवर्जून सांगतो.
अस्लम हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान गावचा. वडिलांच्या निधनामुळे आई गावातल्या काही घरांत धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायची. कुणाचेही पाठबळ नसल्यामुळे अस्लमसह पाच भावंडांनाही पोटासाठी काबाडकष्ट करावे लागले. त्या दिवसांच्या आठवणींनी गंभीर झालेला अस्लम म्हणाला, ‘‘भाऊ-बहीण इतरांच्या शेतांवर मजुरी करायचे, तर मीसुद्धा हॉटेल, रसवंतीगृह, बारमध्ये कामे केली आहेत. पण कबड्डीचा सराव कधीही बुडवला नाही. काही वर्षांनी माझा मोठा भाऊ कबड्डीच्या बळावर पोलिसात रुजू झाला. पण सुरुवातीची काही वर्षे अडचणीच्या काळात लोकांचे कर्ज फेडण्यात गेले. त्यामुळे आईची धुणीभांडी व आम्हा भावंडांची मेहनत सुरूच होती. मग बहिणींची लग्ने झाली. मी ठाण्यात आल्यानंतर जरा बरे दिवस यायला लागले.’’
अहमदनगर ते ठाणे प्रवास कसा झाला, याबाबत अस्लम म्हणाला, ‘‘आधी अहमदनगरला कबड्डी खेळायचो. तिथे बऱ्याच वर्षांची परंपरा आहे. राज्य अजिंक्यपद स्पर्धेपर्यंत मजल मारली. मग २०१५मध्ये प्रथमच राष्ट्रीय उपकनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा खेळलो. त्यावेळी राजू कथोरेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने कांस्यपदक जिंकले. राजूनेच मला ठाण्यातून खेळण्याचा सल्ला दिला. त्याच्या घरी निवासाचीही व्यवस्था केली. वासिंदच्या जय बजरंग मंडळाकडून गेली पाच वर्षे खेळतो आहे. तिथे प्रशिक्षक पुंडलिक गोरले यांनी मला मार्गदर्शन केले.’’
राष्ट्रीय स्पर्धेत अस्लम आणि आकाश शिंदे या चढाईपटू जोडीने महाराष्ट्राच्या आक्रमणाचा आलेख उंचावला. याबाबत अस्लम म्हणाला, ‘‘२०१७-१८मध्ये शालेय क्रीडा स्पर्धेपासून मी आणि आकाश एकत्रित खेळत आहोत. पुणेरी पलटणकडून खेळण्यासाठी मार्गदर्शक अशोक शिंदे यांनी आम्हाला पुन्हा एकत्रित आणले. त्यामुळे आमच्यात चांगली मैत्री झाली. गेली तीन वर्षे सराव करतो आहे. उत्तम समन्वयाचा फायदा सामन्यांत होतो. प्रो कबड्डीच्या आगामी हंगामातही आम्ही उत्तम खेळू.’’
‘‘मोडकळीस आलेल्या घरात माझे बालपण गेले. पावसाळय़ात घरात पाणी गळायचे. प्रो कबड्डीमुळे मी आता पक्के घर घेऊ शकलो. या व्यावसायिक कबड्डीमुळे मला चांगले दिवस आले आहेत. कबड्डी आयुष्य बदलू शकते, हा विश्वास होता. या खेळातील बरीचशी मुले ही गरीब घरातून आली आहेत. त्यांचे जीवनमान प्रो कबड्डीमुळे बदलले आहे,’’ असे अस्लमने सांगितले. अस्लमला युनियन बँकेत असताना प्रशांत सुर्वे यांचे तर एअर इंडियात शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. भारतासाठी सुवर्णपदक जिंकायचे व गावातील खेळाडूंना व्यावसायिक कबड्डीचा मार्ग दाखवायचा, असा विश्वास अस्लमने व्यक्त केला.