सिद्धार्थ देसाईकडून यशाचे श्रेय सूरजला
प्रशांत केणी, मुंबई</strong>
राष्ट्रीय विजेतेपदापर्यंत आधीची काही वर्षे अपयशामुळे आयुष्यात नैराश्य आले होते. अगदी कबड्डी सोडून देण्याच्या विचारात होतो. मात्र भावाने पाठबळ दिले. मेहनतीचे एक दिवस चीज होईल, या शब्दांत धीर दिला. त्यामुळेच हे सोनेरी दिवस अनुभवायला मिळत आहे, हे सांगताना प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामातील सर्वात लोकप्रिय चढाईपटू सिद्धार्थ देसाईच्या डोळ्यांत भूतकाळ उभा ठाकला होता. यंदाच्या हंगामात सिद्धार्थने वेगवान गुणांचे शतक साकारताना राहुल चौधरीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
‘‘प्रो कबड्डी लीगमधील यश हे मागील चार वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे. कबड्डीमुळे इतका लोकप्रिय होईन असे कधीच वाटले नव्हते. या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होतो. आता पुण्यात घर आणि कार घ्यायची आहे,’’ असे सिद्धार्थने सांगितले.
सिद्धार्थ आणि सूरज हे देसाई बंधू कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामधील हुंडळेवाडी गावचे. सूरज मोठा आणि सिद्धार्थ शेंडेफळ. सूरज सिन्नरला झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत चमकत असताना सिद्धार्थ प्रो कबड्डीत गुणांचे इमले बांधत आहे. त्यामुळेच हे कबड्डीपटू भाऊ चर्चेत आहेत. सूरजचे कौशल्य सिद्धार्थने बारकाईने आत्मसात केले आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी या भावांपैकी नेमका कोण खेळतो आहे, हा प्रश्न पडतो. सूरजविषयी सिद्धार्थ म्हणतो, ‘‘वडील शेतकरी असल्याने आर्थिक स्थर्य होते. भाऊ नोकरीला लागला, तेव्हा चांगले दिवस आले. खेळ आणि आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवर सूरज मला मार्गदर्शन करतो. खेळताना चुका होतात, त्यासंदर्भात फोनवरून कानमंत्र देतो.’’
सिद्धार्थ लहानपणीपासून अभ्यासात हुशार होता. त्याला दहावीला ८२ टक्के मिळाले. भौतिकशास्त्रातून पदवीनंतर शारीरिक शिक्षण शिक्षकाचा पदवी अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला. परंतु भाऊ सूरज कबड्डीत कारकीर्द घडवत असताना सिद्धार्थचेही कबड्डीप्रेम वाढू लागले. सुरुवातीला मराठा बटालियनकडून तो खेळू लागला. मग ही नोकरी सोडून तो आप्पासाहेब दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेरच्या सतेज संघात सामील झाला. याच संघाकडून खेळताना अर्जुन पुरस्कार विजेत्या अशोक शिंदे यांनी त्याचा खेळ पाहिला आणि एअर इंडियाच्या संघात स्थान दिले.
मागील वर्षी राष्ट्रीय विजेत्या महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर सिद्धार्थचे नाव लिलावात आले. यू मुंबाने ३६ लाख ४० हजार रुपये किमतीसह त्याला संघात घेतले. प्रो कबड्डीतील आपल्या यशाचे रहस्य उलगडताना सिद्धार्थ म्हणतो, ‘‘गेली पाच वर्षे प्रो कबड्डी पाहात आलो आहे. खेळाडूंची शैली तशीच राहते. त्यांचा अभ्यास माझ्यासाठी उपयुक्त ठरला.’’
कोल्हापूरला संभाजी पाटील आणि रमेश भेंडिगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली घडणाऱ्या सूरजने पहिली महाकबड्डी लीग गाजवली. प्रो कबड्डीच्या सुरुवातीच्या हंगामांमध्ये सेनादलाच्या खेळाडूंना खेळण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे सूरजला या व्यासपीठावर खेळता आले नाही. मग पाचव्या हंगामासाठी त्याची दबंग दिल्लीकडून निवड झाली. परंतु सरावात दुखापत झाल्यामुळे माघार घ्यावी लागली. यावेळी सहाव्या हंगामाच्या लिलावात नाव नसल्यामुळे सूरज चिंतेत होता. मात्र सिद्धार्थच्या यशामुळे सूरजच्या चिंतेची जागा आता आनंदाने घेतली आहे.