‘प्रो कबड्डी लीग’मुळे या खेळात चांगले दिवस आले आहेत. आता येत्या काही वर्षांमध्ये कबड्डीचा ऑलिम्पिकमध्येही समावेश होईल आणि पहिले सुवर्णपदक भारताचे असेल. कबड्डीचा दम जगभरात घुमत राहो, अशा भावना भारताचा आंतरराष्ट्रीय खेळाडू राकेश कुमारने व्यक्त केल्या. शनिवारपासून सुरू होणाऱ्या ‘प्रो कबड्डी’मध्ये राकेश हा पाटणा पायरेट्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ‘प्रो कबड्डी’च्या लिलावामध्ये राकेशवरच सर्वाधिक बोली लागली होती. गेली अनेक वष्रे भारतीय रेल्वेकडून खेळणारा राकेश गेली दहा वष्रे भारताच्या अनेक सुवर्णक्षणांचा साक्षीदार होता. विश्वचषक, आशियाई क्रीडा स्पर्धा, इन्डोअर आशियाई क्रीडा स्पर्धा आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेतील भारताच्या सुवर्णपदक विजेत्या संघात राकेशचा समावेश होता. ‘प्रो कबड्डी लीग’ आणि आगामी आशियाई क्रीडा स्पध्रेविषयी राकेश कुमारशी केलेली खास बातचीत-
*‘प्रो कबड्डी’मध्ये सर्वाधिक १२ लाख ८० हजार रुपयांची बोली तुझ्यावर लागली. हे जेव्हा तुला कळले तेव्हा तुझी काय प्रतिक्रिया होती?
‘प्रो कबड्डी’साठीच्या लिलावासाठी ‘अ’ श्रेणीच्या खेळाडूंच्या यादीत मला स्थान देण्यात आले होते, तेव्हा खूप आनंद झाला. त्यानंतर लिलावामध्ये माझ्यावर सर्वाधिक बोली लागल्याची बातमी माझ्या भारतीय रेल्वेतील सहकाऱ्याने मला सांगितली, तेव्हा क्षणभर माझा विश्वासच बसला नाही. आनंद गगनात मावेनासा झाला. कबड्डीला चांगले दिवस आले आहेत, याची जाणीव झाली.
*पाटणा पायरेट्सची तयारी कशा प्रकारे सुरू आहे?
माझ्या पाटणा संघाचे सराव शिबीर सुरू असून, त्याकडेच आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. प्रशिक्षक आर. एस. खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची योग्य बांधणी करणे हे आमचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. कोणत्या संघाविरुद्ध कोणती व्यूहरचना करायची, हेसुद्धा यात अंतर्भूत आहे. युवा आणि गुणी खेळाडूंचा भरणा असल्यामुळे या संघाकडून खूप आशा आहेत.
*तू भारतीय रेल्वेचे प्रतिनिधित्व करतोस. राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेत याच संघाचे वर्चस्व असते, याचे काय रहस्य आहे?
भारतीय रेल्वे देशभरातील युवा आणि दर्जेदार खेळाडूंना नोकरीत सामावून घेते. गेली अनेक वष्रे भारतीय रेल्वेच्या पुरुष आणि महिला संघांचा राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेवर दबदबा आहे. या संघाचे कोणत्याही राष्ट्रीय स्पध्रेला सामोरे जाण्यापूर्वी एक विशेष शिबीर होते. हा सराव आमच्यासाठी उपयुक्त ठरतो.
*गेली बारा वष्रे तू राष्ट्रीय स्पर्धा खेळत आहेस. कबड्डीच्या प्रवाहात कोणता बदल तुला पाहायला मिळतो आहे?
गेल्या काही वर्षांत कबड्डीची मक्तेदारी उत्तरेकडे गेल्याचे दिसून येते. भारतीय रेल्वे आर्थिकदृष्टय़ा समृद्ध करते. याचप्रमाणे हरयाणा, दिल्लीसारख्या संघांकडून अष्टपैलू खेळाडूंची फळी उदयाला येऊ लागली आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मातीवरची कबड्डी आता अधिकाधिक प्रमाणात मॅटवर खेळली जाऊ लागली आहे. उत्तरेकडे बहुतांशी स्पर्धा आणि सराव हा मॅटवरच होत असल्यामुळे तेथील खेळाडू आघाडीवर पाहायला मिळतात.
*गेली दहा वष्रे तू भारताकडून खेळतोस. अन्य आंतरराष्ट्रीय संघसुद्धा आता बऱ्यापैकी तयार झाले आहेत. याविषयी काय सांगशील?
इराण, जपान, पाकिस्तान आणि कोरियासारख्या देशांचे संघ आता कबड्डी अधिक प्रगल्भपणे खेळू लागले आहेत. त्यांची कामगिरी सुधारत असली तरी भारताने मात्र आपला आंतरराष्ट्रीय पदकावरचा अधिकार सोडलेला नाही, हे महत्त्वाचे आहे.
*सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई कबड्डी स्पध्रेसाठी ‘प्रो कबड्डी’मधील खेळाचा कसा फायदा होईल?
भारतीय संघाचे सराव अभियान गेले वर्षभर सुरू होते. सर्वच खेळाडू त्यासाठी मेहनत घेत आहेत. इन्चॉनमध्ये आशियाई सुवर्णपदक भारताचेच असेल, याची मला खात्री आहे. ‘प्रो कबड्डी’मध्ये आमच्या खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सराव होणार आहे.
*‘प्रो कबड्डी’मध्ये अनेक देशांचे आंतरराष्ट्रीय खेळाडू तुमच्यासोबत खेळतील किंवा समोरच्या संघातून खेळतील. याचा फायदा किंवा तोटा कशा प्रकारे होऊ शकतो?
अनेक परदेशी खेळाडू कबड्डीच्या तंत्रामध्ये नवशिके आहेत. भारतात खेळल्याने त्यांना शिकण्यासारखे खूप आहे. या स्पध्रेद्वारे अनेक खेळाडूंची बलस्थाने आणि कच्चे दुवे समजतील. ज्याचा आशियाई स्पध्रेत आम्हाला फायदा होईल.

Story img Loader