कोल्हापूरच्या मातीमध्ये दोन खेळ नखशिखान्त रुजले आहेत, फुटबॉल आणि कुस्ती. फुटबॉल म्हणाल तर हे महाराष्ट्रातील प्रति कोलकाताच. याचप्रमाणे मातीतल्या कुस्तीची परंपरा येथे अखंड जपली जात आहे. फुटबॉल आणि कुस्तीसाठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होते. त्या तुलनेत कबड्डीला प्रतिसाद कमी मिळतो, पण कोल्हापूरच्या शहरी भागाकडून थोडेसे गावागावांमध्ये वळल्यास कबड्डीलाही पोषक वातावरण असल्याचे आढळून येते, परंतु कोल्हापूर शहरात झालेल्या छत्रपती शिवाजी करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेचा माहोल क्रीडारसिकांचे मन वेधू शकला नाही. ‘नुसती शिट्टीच घुमली..’ हे सत्य मान्य करण्यावाचून पर्याय नाही. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर झालेल्या या स्पध्रेत ३२ पैकी ८ म्हणजे एक चतुर्थाश कबड्डी संघांनी माघार घेतल्यामुळे आधीच यजमान चिंतेत होते, परंतु स्नेहल साळुंखे, दीपिका जोसेफ, सुवर्णा बारटक्के, गौरी वाडेकर, प्रशांत चव्हाण, शैलेश सावंत, गौरव शेट्टी आदी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कबड्डीपटूंचा खेळ पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसले नाही. शनिवारी सायंकाळी पाटाकडील तालीम मंडळ (अ) आणि खंडोबा तालीम मंडळ (अ) यांच्यातील अस्मिता चषक फुटबॉल स्पध्रेसाठीच्या अंतिम सामन्याला शाहू स्टेडियमवर १८ हजार क्रीडारसिकांची खचाखच गर्दी जमली होती; तथापि कबड्डीच्या अंतिम सामन्याला पाच हजार प्रेक्षक हजर होते. कोल्हापूरकरांना फुटबॉलमधील ‘अस्मिता’ कोण टिकविणार याचे जितके औत्सुक्य होते, तितके कबड्डीमधील प्रतिष्ठेचे जेतेपद कोण जिंकणार याचे नव्हते.
मार्च महिन्याच्या परीक्षेच्या काळात आलेली ही स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत घेणे, हे महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनला क्रमप्राप्त होते. या स्पध्रेसाठी भले मोठे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. त्याचे नेपथ्य अनंत खासबारदार आणि शिरीष खांडेकर यांच्या ‘निर्मिती ग्राफिक्स’ने आकर्षक पद्धतीने तयार केले. याशिवाय उद्घाटनाच्या दिवशी आणि समारोपाला आकर्षक स्क्रीन लावण्यात आले होते. याचप्रमाणे कबड्डी गीताची एक सीडीसुद्धा या दरम्यान प्रकाशित झाली. ‘घुमली रे.. घुमली रे शिट्टी घुमली..’ असे हे गीत पाचही दिवस वारंवार वाजविण्यात येत होते. या स्पध्रेला अभिनेता धर्मेद्र, अभिनेत्री महिमा चौधरी यांनीसुद्धा आवर्जून भेट दिली, पण तरीसुद्धा फुटबॉल आणि कुस्तीपर्यंत कबड्डीला पाच दिवससुद्धा पोहोचता आले नाही.
छत्रपती शिवाजी करंडक कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने राज्य शासनाकडून मिळणारे ५० लाख रुपये महाराष्ट्रातील ख्ेाळाडूंनाच मिळावे, या उद्देशाने ही महत्त्वाकांक्षी स्पर्धा अखिल भारतीयऐवजी राज्यस्तरीय झाली. या स्पध्रेत यंदा पुरुष आणि महिला गटांमधील प्रत्येकी १२ आणि विदर्भाच्या प्रत्येकी चार जिल्ह्य़ांना संधी देण्यात आली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी स्वत:ची राजकीय आणि आर्थिक ताकद पणाला लावली. दोन्ही गटांमधील विजेत्या संघांना दुबईवारी, मालिकावीर पुरस्कार विजेत्यांना दुचाकी, याशिवाय प्रत्येक सामन्यातील विजय आणि पराभवासाठी रोख बक्षीस असा ५० लाखांचा शासकीय हिशेब मांडण्यात आला, पण कबड्डीचा प्रचार-प्रसार कोल्हापूरमध्ये होण्याच्या दृष्टीने काय झाले, हा प्रश्न निरुत्तरितच आहे. या स्पध्रेच्या निमित्ताने अनेक जिल्हा आणि राज्य पातळीवरील संघटकांचे पाय कोल्हापूरमध्ये लागले. काही महिन्यांवर आलेल्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यात यापैकी अनेकांना रस असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे या स्पध्रेच्या निमित्ताने केवळ भव्य-दिव्य आयोजन आणि बक्षिसांची खरात यापुरतीच कबड्डी कोल्हापूरमध्ये मर्यादित दिसून आली.
धावते गुणफलक, दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण, कबड्डी प्रसारात्मक कार्यक्रम आदी गोष्टींचे मसाले कोल्हापूरमधील या स्पध्रेत दिसले असते तर हा खमंगपणा अधिक फलदायी ठरला असता.
कोल्हापूरमध्ये नुसती शिट्टीच घुमली..!
कोल्हापूरच्या मातीमध्ये दोन खेळ नखशिखान्त रुजले आहेत, फुटबॉल आणि कुस्ती. फुटबॉल म्हणाल तर हे महाराष्ट्रातील प्रति कोलकाताच. याचप्रमाणे मातीतल्या कुस्तीची परंपरा येथे अखंड जपली जात आहे. फुटबॉल आणि कुस्तीसाठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-03-2013 at 01:15 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kabaddi is not as popular as football in kolhapur