ही घटना आहे १९९८ची. बँकॉकच्या आशियाई क्रीडा स्पध्रेसाठी बारू राम सिंगची भारतीय संघात निवड झाली होती. परंतु स्पध्रेला तीन दिवस बाकी असताना बारू रामचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले. भारताकडून खेळून आशियाई सुवर्णपदक जिंकण्याचे बारू रामचे स्वप्न अधुरे राहिले. पण त्यावेळी आठ वर्षांच्या सुरजीतने कबड्डीपटू होण्याचाच निर्धार केला आणि तब्बल १६ वर्षांनी
लहान भावाने बारू रामचे स्वप्न पूर्ण केले.
प्रो-कबड्डी लीगच्या तिसऱ्या हंगामात दबंग दिल्लीचे प्रतिनिधित्व करणारा सूरजीत भावुकतेने आपली कथा सांगू लागला. ‘‘भावाने जग सोडले, तेव्हा मी खूप लहान होतो. परंतु कुटुंबावरील शोककळेची मला जाणीव होती. सातव्या इयत्तेत गेल्यावर कबड्डी खेळायला प्रारंभ केला. तेव्हा अनेकांकडून भावाच्या खेळाचे कौशल्य आणि त्याचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न याविषयी ऐकायला मिळायचे. मग राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा, नंतर किशोर, कुमार, वरिष्ठ राष्ट्रीय अशी भारतीय संघाच्या दिशेने एकेक पायरी चढत गेलो,’’ असे सांगताना त्याच्या डोळ्यांत अश्रू दाटले.
तो पुढे म्हणाला, ‘‘२०१०मध्ये भारतीय संघाच्या सराव शिबिरात माझी निवड झाली. मात्र भारतीय संघाचे दरवाजे खुले होण्यासाठी आणखी काही वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. २०१३मध्ये इनडोअर आशियाई क्रीडा स्पध्रेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले. मग २०१४मध्ये इन्चॉनला झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेसाठी भारताकडून खेळून भावाचे अधुरे स्वप्न मी पूर्ण केले. त्यावेळी माझ्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. भारताला सुवर्णपदक जिंकून देऊन जेव्हा घरी परतलो, तेव्हा अख्खा गाव माझ्या स्वागतासाठी लोटला होता. भावाचे स्वप्न पूर्ण केल्याचा सार्थ अभिमान मला वाटत होता. आता माझ्या गावी भावाच्या नावाने स्टेडियमसुद्धा बांधण्यात आले आहे.’’
प्रो-कबड्डीच्या पहिल्या हंगामासाठी झालेल्या लिलावात तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोली सुरजीत सिंगवर लावण्यात आली होती. बंगाल वॉरियर्सचा तो कर्णधार होता. परंतु सेनादल क्रीडा नियामक मंडळाने प्रो-कबड्डी न खेळण्याचे धोरण निश्चित केल्यामुळे त्याला खेळता आले नव्हते. तिसऱ्या हंगामात सेनादलाच्या खेळाडूंना प्रो-कबड्डी खेळण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे १२ खेळाडू सहा संघांकडून खेळत आहेत. याबाबत सुरजीत म्हणाला, ‘‘सेनादलाच्या खेळाडूंचाही प्रो-कबड्डी लीगमध्ये प्रवेश झाल्याचा मला अतिशय आनंद होत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या भारतीय कुस्ती लीगमध्येसुद्धा सेनादलाचे खेळाडू खेळले होते. लष्कराचे खेळाडू दर्जाला साजेसा खेळ दाखवतील, यावर माझा विश्वास आहे.’’
दिल्ली संघाच्या कामगिरीबाबत सुरजीत म्हणाला, ‘‘संघाची कामगिरी उंचावण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. दबंग दिल्ली या नावाला साजेशी कामगिरी आम्ही करून दाखवू.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा