‘राहुल.. राहुल..’ हा नाद राजीव गांधी क्रीडा संकुलात अविरत घुमत होता. त्याच्या प्रत्येक चढाईला प्रेक्षक मनमुराद दाद देत होते. तोही रसिकांच्या या टाळ्यांना न्याय देत आपली अदाकारी सादर करीत होता. हे चित्र स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगच्या विशाखापट्टणम्मधील प्रत्येक सामन्यात दिसून येत होते. तेलुगू टायटन्सचा संघनायक राहुल चौधरी आता देशविदेशातील कबड्डीशौकिनांच्या हृदयसिंहासनावर राज्य करू लागला आहे. ‘कबड्डीच्या क्षितिजावरील एकतारा म्हणजे राहुल चौधरी’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
राहुलचे वडील रामपाल सिंग पोलीस दलात होते. कबड्डी खेळात हातपाय मोडतील, त्यामुळे हा खेळ खेळू नको, असा सल्ला रामपाल यांनी राहुलला दिला होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या राहुलला बऱ्याचदा मार खावा लागला होता. मात्र आता राहुलला कबड्डी खेळामुळे लोकप्रियता मिळते आहे. याविषयी आई-वडिलांना कसे वाटते आहे, हे सांगताना राहुल क्षणभर भावुक झाला. तो म्हणाला, ‘‘मागील हंगामात माझे आई-वडील दिल्लीला आले होते. दबंग दिल्लीविरुद्ध आमचा रोमहर्षक सामना अनिर्णीत राहिला. तो सामना पाहून ते धन्य झाले. दुखापती होणार नाही याची काळजी घे आणि डोके वापरून खेळ, असा सल्ला त्यांनी दिला.
प्रो कबड्डीच्या व्यासपीठावर सर्वोत्तम चढाईपटू म्हणून गणला जाणारा राहुल हा आधी उजवा कोपरारक्षक होता. परंतु जसा क्रिकेट हा फलंदाजाचा खेळ असतो, तसेच कबड्डीमध्ये क्षेत्ररक्षकाला काहीही महत्त्व नसते, हे लक्षात आल्यामुळे त्याने चांगला चढाईपटू होण्याकडे लक्ष केंद्रित केले. प्रो कबड्डीच्या पहिल्याच हंगामात तो सर्वोत्तम चढाईपटू ठरला. २०१४च्या आशियाई क्रीडा स्पध्रेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली होती. परंतु पासपोर्टच्या समस्येमुळे तो भारताचे प्रतिनिधित्व करू शकला नव्हता. मात्र त्याच वर्षी फुकेटला झालेल्या आशियाई समुद्रकिनारी स्पध्रेत त्याने भारताचे नेतृत्व केले होते. २०१८च्या आशियाई क्रीडा स्पध्रेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न त्याने जोपासले आहे. कबड्डी खेळलो नसतो तर सेनादलात सामील होऊन देशाची सेवा केली असती, असे तो आत्मविश्वासाने सांगतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा