* घोषित झालेल्या ८ पैकी ६ जागांवर कब्जा
* महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षस्थानी किशोर पाटील
* कार्याध्यक्षपदावर डॉ. दत्ता पाथरीकर यांची बिनविरोध निवड
* प्रतिष्ठेच्या सरकार्यवाहपदासाठी रमेश देवाडिकर आणि गणेश शेट्टी यांच्यात थेट लढत
* संयुक्त कार्यवाहपदाच्या पाच जागांसाठी सात उमेदवार रिंगणात
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी ठाणे, कोल्हापूरसहित मराठवाडय़ामधील जिल्ह्यांनी एकत्रित येऊन आपल्या महायुतीची ताकद कबड्डीविश्वाला दाखवून दिली. निवडणूक नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या महत्त्वाच्या दिवशी राज्य कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या १४ जागांपैकी आठ जागांचा बिनविरोधपणे फैसला झाला असून, कबड्डी विकास पॅनेलने जोरदार मुसंडी मारत सहा जागा काबीज केल्या आहेत. प्रतिष्ठेच्या अध्यक्षस्थानावर औरंगाबादच्या किशोर पाटील यांची तर कार्याध्यक्षपदावर जालनाच्या डॉ. दत्ता पाथरीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. याचप्रमाणे कोषाध्यक्षपदावर अर्जुन पुरस्कार विजेत्या पुण्याच्या शांताराम जाधव यांनी स्थान मिळवले आहे.
आता २८ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीत प्रतिष्ठेच्या सरकार्यवाहपदासाठी ठाण्याचे रमेश देवाडिकर आणि सांगलीचे गणेश शेट्टी यांच्यात ‘काँटे की टक्कर’ होणार आहे. याचप्रमाणे संयुक्त कार्यवाह पदाच्या पाच जागांसाठी मुंबईचे विश्वास मोरे, रत्नागिरीचे रवींद्र देसाई, अहमदनगरचे सुनील जाधव, नाशिक प्रकाश बोराडे, धुळ्याचे मुझफ्फर अली अब्बास अली सय्यद, हिंगोलीचे प्रा. उत्तमराव इंगळे आणि परभणीचे मंगल पांडे या सात उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या १४ जागांसाठी निवडणूक होणार होती. परंतु गुरुवारी २० उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे मागे घेतल्यामुळे सरकार्यवाह आणि संयुक्त कार्यवाह सोडल्यास बाकी सर्व जागांचा बिनविरोध निकाल लागला. राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकर (सिंधुदुर्ग) आणि पुण्याचे बाबुराव चांदेरे यांच्यासह पाच जणांची उपाध्यक्षपदावर निवड झाली.
मागील कार्यकारिणीत उपाध्यक्षपद भूषविणारे आमदार भाई जगताप आणि शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी गुरुवारी धक्कादायकरीत्या आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. याचप्रमाणे मावळते सरकार्यवाह मोहन भावसार यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे सर्वानाच आश्चर्य वाटले. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्यपदावर भावसार सर्वाधिक मतांनी निवडून आले होते.
कबड्डी विकास पॅनेलची मुसंडी
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी ठाणे, कोल्हापूरसहित मराठवाडय़ामधील जिल्ह्यांनी एकत्रित येऊन आपल्या महायुतीची ताकद कबड्डीविश्वाला दाखवून दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-04-2013 at 04:11 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kabaddi vikas pannel on top