आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल दर्जाच्या वृत्तवाहिनीने व्यावसायिक कबड्डी लीगच्या प्रक्षेपणाची जबाबदारी स्वीकारल्यामुळे हा खेळ लोकप्रियतेबाबत क्रिकेटलाही मागे टाकेल, असा आत्मविश्वास पुणेरी पलटण संघाचा कर्णधार व आंतरराष्ट्रीय खेळाडू वझिर सिंग याने व्यक्त केला आहे.
‘‘पुणेरी पलटण संघाचा येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत कसून सराव सुरू आहे. या स्पर्धेला आयपीएलसारखीच प्रसिद्धी मिळत आहे. स्पर्धेपूर्वी वृत्तवाहिन्यांमार्फत या स्पर्धेचा भरपूर प्रचार होत आहे. कबड्डीसारख्या देशी खेळात असे प्रथमच घडत आहे, हीच या स्पर्धेची जमेची बाजू असणार आहे. परदेशातही या स्पर्धेचा प्रचार झाला तर नजीकच्या काळात अधिकाधिक देशांमध्ये हा खेळ लोकप्रिय होण्यास मदत होईल,’’ असे वझिर सिंग म्हणाला.
‘प्रो कबड्डी लीग’मध्ये विजेतेपद मिळविण्याची वझिरला खात्री आहे. संभाव्य लढतींविषयी तो म्हणाला, ‘‘ही स्पर्धा प्रथमच होत असल्यामुळे प्रत्येक संघ बलाढय़ प्रतिस्पर्धी आहे असेच मी मानत आहे. या संघांमधील काही खेळाडूंबरोबर मी खेळलो असल्यामुळे त्यांचे कौशल्य व उणिवांचा मला बारकाईने अभ्यास आहे. त्याचाच फायदा मला मिळेल. आमचे प्रशिक्षक रामपाल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भरपूर सराव करीत आहोत. त्यामुळे आम्हाला प्रतिस्पर्धी संघांच्या आव्हानाला सामोरे जाताना अडचण येणार नाही.’’
संघातील परदेशी खेळाडूंबरोबर कसा समन्वय साधला जाणार आहे, याविषयी वझिर म्हणाला, ‘‘एका वेळी प्रत्यक्ष सामन्यात एखाद्याच परदेशी खेळाडूला संधी दिली जाईल. अर्थात त्यांच्यासमवेत खेळताना आम्हाला अडचण येणार नाही. एक-दोन दिवसांचा सरावही पुरेसा आहे. आमच्या संघातील परदेशी खेळाडू हे चढायांमध्येच अव्वल दर्जाचे आहेत.’’
‘‘मातीच्या मैदानांपेक्षा मॅटवरील कबड्डीला मी प्राधान्य देतो चढायांमध्ये अव्वल दर्जाच्या खेळाडूंना मॅटवर खेळताना कोणतीही अडचण येत नाही. मात्र पकड करताना मॅटपेक्षा मातीचे मैदान हे जास्त चांगले असते. सुरुवातीला मॅटवर खेळताना पाय मुरगळणे, पायाच्या घोटय़ास दुखापती होणे आदी समस्यांना आम्हास सामोरे जावे लागत होते. आता राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धाही मॅटवरच होत असल्यामुळे अशा मैदानांशी आम्ही समरस झालो आहोत,’’ असे वझिरने सांगितले.
‘‘बोनस रेषेच्या गुणांवर आम्ही भर देणार असलो तरी त्यामध्ये पकड होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे त्याबाबत थोडी काळजी घेण्याचे आमचे धोरण राहील,’’ असे तो पुढे म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा