विश्वविजेत्या महिला कबड्डी संघातील अभिलाषा म्हात्रे, सुवर्णा बारटक्के आणि दीपिका जोसेफ या तिघींना प्रथम वर्ग अधिकाऱ्याची नोकरी लवकरात लवकर दिली जाईल आणि त्यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचे बक्षीस ३१ मार्चपर्यंत दिले जाईल, अशी घोषणा क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांनी विधानपरिषदेत केली. आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत हिला पदोन्नती देण्याबाबतही तातडीने निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी घोषणा करूनही सरकार खेळाडूंना नोकऱ्या देत नाही, पारितोषिकांची रक्कम देत नाही व सन्मानाची वागणूक देत नाही, आदी मुद्दे चंद्रकांत पाटील, विनोद तावडे आदींनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केले होते. क्रीडास्पर्धामध्ये चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंना थेट शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. त्यांनी ८ खेळाडूंना अ वर्ग व ४ खेळाडूंना ब वर्ग पदावर नियुक्तीची शिफारस केली आहे. अ वर्गात सहा व ब वर्गात ४ खेळाडूंना नियुक्ती दिली गेली आहे. उर्वरित दोन खेळाडूंबाबतही कार्यवाही करण्यात येत आहे.
तेजस्विनी सावंत हिला क्रीडा विभागात विशेष कार्य अधिकारी पद निर्माण करून २००८ मध्ये नियुक्त केले गेले. ते एकमेव पद असल्याने पदोन्नती देता येत नाही. पण सामान्य प्रशासन विभागाशी चर्चा करून क्रीडा उपसंचालक किंवा अन्य पदांवर पदोन्नतीचा निर्णय घेतला जाईल, असे वळवी यांनी सांगितले.

Story img Loader