Kagiso Rabada breaks Waqar Younis World record in BAN vs SA 1st Test : दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. सोमवारी (२१ ऑक्टोबर) ढाका येथे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान त्याने मोठी कामगिरी केली. रबाडाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विश्वविक्रम केला. त्याने बांगलादेशचा अनुभवी फलंदाज मुशफिकर रहीमला पहिल्या डावात बाद करत पाकिस्तानच्या महान वकार युनूसचा विक्रम मोडीत काढला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कागिसो रबाडाने रहीमच्या रुपाने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ३०० वी विकेट घेतली. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये ३०० विकेट्स पूर्ण करणारा तो सहावा दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ठरला. तो आता ॲलन डोनाल्ड, शॉन पोलॉक आणि डेल स्टेनसारख्या महान खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. घरच्या मैदानावर बांगलादेशचा संघ पहिल्या डावात १०६ धावांत गारद झाला. कागिसो रबाडाने ११ षटकात २६ धावा देत ३ बळी घेतले. मुशफिकुर रहीमशिवाय त्याने लिटन दास आणि नईम हसनला बाद केले.

कागिसो रबाडाने वकार युनूसला मागे टाकत केला विश्वविक्रम –

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाद कागिसो रबाडा हा कसोटी इतिहासातील सर्वात कमी चेंडूत ३०० विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. या बाबतीत त्याने वकार युनूसचा विक्रम मोडला आहे. वकार युनूसने १२६०२ चेंडूत ३०० कसोटी विकेट्स घेतल्या होत्या. आता रबाडाने त्याचा विक्रम मोडत ११८८७ चेंडू टाकत ३०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत .या बाबतीत, डेल स्टेन तिसऱ्या स्थानावर (१२६०५ चेंडू) आणि ॲलन डोनाल्ड चौथ्या स्थानावर (१३६७२ चेंडू) आहे.

हेही वाचा – Ranji Trophy : मुंबईचा महाराष्ट्रावर दणदणीत विजय, ९ विकेट्सनी धूळ चारत नोंदवला हंगामातील पहिला विजय

सर्वात कमी चेंडूत ३०० कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज –

कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका): ११८१७ चेंडू
वकार युनूस (पाकिस्तान) : १२६०२ चेंडू
डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका) : १२६०५ चेंडू
ॲलन डोनाल्ड (दक्षिण आफ्रिका) : १३६७२ चेंडू

दक्षिण आफ्रिकेचा तिसरा गोलंदाज –

रबाडा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये ३०० विकेट्स घेणारा दक्षिण आफ्रिकेचा तिसरा गोलंदाज ठरला. या बाबतीत त्याच्या पुढे डेल स्टेन आणि ॲलन डोनाल्ड आहेत. रबाडाने आपल्या ६५व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली. दुसरीकडे, स्टेनने २०१३ मध्ये ६१व्या कसोटीत आणि डोनाल्डने २००० मध्ये ६३व्या कसोटीत हे यश संपादन केले होते.

हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहली भारताच्या पराभवानंतर रमला कीर्तनात, पत्नी अनुष्काबरोबरचा VIDEO होतोय व्हायरल

दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज :

  • ४३९ बळी – डेल स्टेन (९३ कसोटी)
  • ४२१ विकेट – शॉन पोलॉक (१०८ कसोटी)
  • ३९० विकेट- मखाया एनटिनी (१०१ कसोटी)
  • ३३० विकेट्स- ॲलन डोनाल्ड (७२ कसोटी)
  • ३०९ विकेट – मॉर्ने मॉर्केल (८६ कसोटी)
  • ३०२* विकेट – कागिसो रबाडा (६५ कसोटी)
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kagiso rabada completes 300 test wickets in low balls surpassing waqar younis world record in ban vs sa 1st test vbm