Kagiso Rabada create history in SA20 : सध्या दक्षिण आफ्रिकेत एसएट्वेन्टी २०२५ स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेतील सहावा सामना एमआय केपटाऊन आणि पार्ल रॉयल्स यांच्यात १३ जानेवारी रोजी खेळला गेला. ज्यामध्ये केपटाऊन संघाने ३३ धावांनी पार्ल संघाचा पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एमआय केपटाऊनने ७ बाद १७२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पार्ल रॉयल्स ९ बाद १३९ धावांवर गारद झाले. यादरम्यान कगिसो रबाडाने धारदार गोलंदाजी करताना २ विकेट्स घेत कोणालाच न जमलेली कामगिरी करत इतिहास घडवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्या एमआय केपटाऊनसाठी रीझा हेंड्रिक्सने ३७ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने शानदार ५९ धावा केल्या. तर, व्हॅन डर ड्युसेनने ३३ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. पार्ल रॉयल्सकडून दयान गालीमने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. एमआय केपटाऊनच्या १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पार्ल रॉयल्सच्या सलामीच्या जोडीने दमदार सुरुवात केली. पहिल्या ३ षटकांत धावफलकावर ३८ धावा लावल्या. त्यानंतर चौथ्या षटकात कागिसो रबाडा गोलंदाजीला सुरुवात करण्यासाठी आला आणि पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने पार्ल रॉयल्सचा सलामीवीर जो रूटला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रुट १४ चेंडूत २६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

कगिसो रबाडाने लिहिला नवा इतिहास –

रुट पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर सॅम हॅन नवीन फलंदाज म्हणून क्रीझवर आला पण पुढच्या ५ चेंडूंवर त्याला एकही धाव करता आली नाही. अशाप्रकारे रबाडाचे हे षटक विकेटसह मेडन ठरले. यानंतर राशिद खान पाचवे आणि आपले पहिले षटक टाकण्यासाठी आला परंतु त्याने १५ धावा दिल्या. यानंतर सहावे षटक टाकायला आलेल्या रबाडाने आपल्या पहिल्याच षटकातील पराक्रमाची पुनरावृत्ती केली. त्याने दुसऱ्या षटकाची सुरुवातही विकेट्सने केली. यावेळी रबाडाने सलामीवीर लुआन-ड्रे प्रिटोरियसची शिकार केली. प्रिटोरियस १२ चेंडूत २६ धावा करून बाद झाला. पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर रबाडाने पुढच्या ५ चेंडूंवर एकही धाव दिली नाही आणि पुन्हा एकदा सलग दुसरे षटक मेडन टाकून नवा इतिहास लिहला.

हेही वाचा – Jasprit Bumrah : ‘बुमराहशी माझी तुलना करू नका…’, वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे वर्कलोड मॅनेजमेंटबाबत मोठं वक्तव्य

कगिसो रबाडाने पॉवरप्लेमध्ये सलग दोन मेडन षटके टाकली .अशा प्रकारे एसएट्वेन्टी लीगच्या इतिहासात पॉवरप्लेमध्ये सलग दोन मेडन षटके टाकणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला. याआधी या लीगमध्ये कोणत्याही गोलंदाजाने असा पराक्रम केला नव्हता. इतकेच नाही तर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक मेडन षटकं टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रबाडाने आता मोठी झेप घेतली आहे. सलग दोन मेडन षटकांच्या मदतीने त्याने १६ गोलंदाजांना मागे टाकले. आता तो टी-२० क्रिकेटमध्ये १० किंवा त्याहून अधिक मेडन षटके टाकणाऱ्या गोलंदाजांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. रबाडाने याबाबतीत आर अश्विन (९ षटकं) आणि युझवेंद्र चहल (९ षटकं) या दिग्गज गोलंदाजांना मागे टाकले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kagiso rabada create history first sa20 2025 bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay vbm