आयपीएल स्पर्धा दोन दिवसांवर आलेली असताना दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला मोठा झटका बसला आहे. दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो राबाडा यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राबाडाला दिल्ली डेअरडेव्हिल्सने विकत घेतले होते. सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या राबाडावर त्यांची मुख्य भिस्त होती. पाठिच्या दुखापतीमुळे राबाडाला पुढचे तीन महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. त्यामुळे या आठवडयापासून सुरु होत असलेल्या आयपीएल स्पर्धेत तो खेळू शकणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाँडर्स येथील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात राबाडाच्या पाठिला दुखापत झाली असे दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे डॉक्टर मोहम्मद मुसाजी यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेने हा सामना ४९२ धावांनी जिंकताना मालिका ३-१ ने खिशात घातली होती. या कसोटी सामन्या दरम्यानच राबाडाला पाठिच्या दुखापतीचा त्रास जाणवत होता. अखेर स्कॅनमध्ये त्याची दुखापती गंभीर असल्याचे निदान झाले.

डॉक्टरांनी त्याला तीन महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. राबाडा आता थेट जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार आहे. आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत राबाडा सध्या पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या मालिकेत २२ वर्षीय राबाडाला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता. त्याने १९.२६ च्या सरासरीने २३ विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही दुखापतीमुळे आयपीएलमध्ये खेळणार नाहीय.

 

 

मराठीतील सर्व आयपीएल २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kagiso rabada ruled out of ipl