दक्षिण आफ्रिकेच्या ‘पंक्चर’ झालेल्या डावाला बहुतांशी वेळा ‘जॅक’ लावून गाडी रुळावर आणणारा महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याला आगामी विश्वचषकामध्ये खेळता येणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती पत्करली असली तरी तो ट्वेन्टी-२० लीगमध्ये खेळत राहणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत लौकिकाला साजेशी कामगिरी न करता आल्यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला.
कसोटी क्रिकेटमध्ये कॅलिसने १६६ सामन्यांमध्ये ५५.३७ च्या सरासरीने १३,२८९ धावांसह ४५ शतके आणि ५८ अर्धशतके झळकावली आहेत. भारताच्या सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक कसोटी शतकांमध्ये त्याचा दुसरा क्रमांक लागतो. या १६६ कसोटी सामन्यांमध्ये त्याने पाच वेळा डावात पाच विकेट्स घेण्याची किमया करत २९२ बळी मिळवले असून २०० झेलही टिपले आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये कॅलिसने ३२८ सामन्यांमध्ये ११,५७९ धावांसह १७ शतके आणि ८६ अर्धशतके असून २७३ बळी त्याच्या नावावर आहेत. १९९५ मध्ये  कॅलिसने आफ्रिकेकडून पदार्पण केले. काही क्रिकेटतज्ज्ञांनी कॅलिसची तुलना महान अष्टपैलू खेळाडू सर गॅरी सोबर्स यांच्याबरोबर केली.
कॅलिसला २०१५चा विश्वचषक खेळण्याची तीव्र इच्छा होती. कारण त्याला देशाला विश्वचषक जिंकवून द्यायचा होता, पण श्रीलंकेत लौकिकाला साजेशी कामगिरी न झाल्याने त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीलंकेतील वाईट कामगिरीमुळे माझे विश्वचषक खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. पण श्रीलंकेत खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणवान असून तो नक्कीच मार्च महिन्यामध्ये मायदेशात विश्वचषक घेऊन येईल. माझ्या या कारकिर्दीमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट मंडळ, संघ, चाहते आणि माझ्या कारकिर्दीसाठी मेहनत घेणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. हा एक अद्भुत प्रवास होता.      
जॅक कॅलिस

Story img Loader