महिला मानांकन टेनिस स्पर्धा
बेलारुसच्या एरिना सॅबेलेन्काने सातव्या मानांकित निना स्टोजानोविकवर मात करीत महिलांच्या एनईसीसी करंडक आंतरराष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. तिला रशियाच्या व्हॅलेन्सिया कामनेस्कायाशी झुंजावे लागणार आहे.
डेक्कन जिमखाना क्लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सॅबेलेन्काने वेगवान खेळ करीत स्टोजानोविकचा ६-२, ६-२ असा दणदणीत पराभव केला. त्या तुलनेत कामनेस्कायाला झुंजावे लागले. तिने आपलीच सहकारी अ‍ॅना मोर्गियानावर २-६, ६-२, ६-२ अशी मात केली.
दुहेरीत व्हॅलेन्टिना इव्हाखेन्को (रशिया) व अ‍ॅनास्ताशिया व्हॅसिलियेव्हा (युक्रेन) यांनी विजेतेपद मिळविताना प्रार्थना ठोंबरे (भारत) व चिएहेयु सुओ (चीन तैपेई) यांना ४-६, ६-२, १२-१० असे संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभूत केले.
एकेरीतील एकतर्फी लढतीत सॅबेलेन्काने स्टोजानोविक हिच्याविरुद्ध चतुरस्र खेळ करीत वर्चस्व गाजवले. दोन्ही सेट्समध्ये तिने क्रॉसकोर्ट फटक्यांचा बहारदार खेळ केला तसेच तिने नेटजवळून प्लेसिंगचाही उपयोग केला.
उपांत्य फेरीतील अन्य लढतीत कामनेस्कायाला निनाविरुद्ध पहिल्या सेटमध्ये सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवता आले नाही. मात्र दुसऱ्या सेटमध्ये तिला सूर गवसला. तेथून तिने खेळावर नियंत्रण मिळवले. दुसऱ्या व तिसऱ्या सेटमध्ये तिने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा उपयोग करीत प्रत्येकी दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. याच ब्रेकच्या आधारे तिला विजय मिळविता आला. एकेरीचा अंतिम सामना शनिवारी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.

Story img Loader