Kane Williamson becomes fastest batter in history to smash 32 Test tons : न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसनने कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक शतक झळकावून मोठी कामगिरी केली आहे. त्याने आता सर्वाधिक शतकांच्या बाबतीत स्टीव्ह स्मिथच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन या दोघांची कसोटी क्रिकेटमध्ये ३२-३२ शतके आहेत. पंरतु, केन विल्यमसनने स्टीव्ह स्मिथपेक्षा कमी डाव खेळून ३२ कसोटी शतके पूर्ण केली आहेत. त्यामुळे तो सर्वात वेगवान ३२ कसोटी शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध माऊंट मौनगानुई येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात केन विल्यमसनने शानदार शतक झळकावून संघाला विजयाकडे नेले. केन विल्यमसनने शानदार फलंदाजी करत न्यूझीलंडला विजयासाठी २६७ धावांचे आव्हान दिले आणि त्यामुळेच किवी संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला.
विल्यमसनने १७२ व्या डावात ३२ शतके पूर्ण केली. यासाठी स्टीव्हन स्मिथने १७४ डाव घेतले होते. रिकी पाँटिंगने १७६ डावांमध्ये ३२वे शतक तर सचिन तेंडुलकरने १७९ डावांमध्ये ३२वे शतक पूर्ण केले होते. जगातील अव्वल क्रमांकाच्या कसोटी फलंदाजाने आता शेवटच्या सात कसोटी सामन्यांमध्ये सात शतके ठोकली आहेत. माऊंट मौनगानुई येथील मालिकेतील पहिल्या कसोटीत ३३ वर्षीय विल्यमसनने दोन्ही डावांत (११८ आणि १०९) शतके झळकावली.
हेही वाचा – WTC Points Table : न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय मिळवत पटकावले अव्वल स्थान, भारताला बसला फटका
युनूस खान आणि जॅक कॅलिसच्या विक्रमाशी केली बरोबरी –
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत किवी संघाने २८१ धावांनी विजय नोंदवला होता. विल्यमसनने कसोटी सामन्याच्या चौथ्या डावातील सर्वाधिक शतकांच्या बाबतीत पाकिस्तानचा फलंदाज युनूस खानच्या शतकाची बरोबरी केली. दोघांची ५ शतके आहेत. या खेळीसह विल्यमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहावे शतक झळकावले. न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका कसोटीत सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या जॅक कॅलिसच्या विक्रमाशीही बरोबरी केली. घरच्या भूमीवर सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याने आता डॉन ब्रॅडमन आणि जो रूट यांना मागे टाकले आहे. केन विल्यमसनचे हे न्यूझीलंडच्या भूमीवर १९ वे शतक आहे आणि या बाबतीत त्याने ब्रॅडमन आणि जो रूट यांना मागे टाकले आहे, ज्यांनी घरच्या भूमीवर प्रत्येकी १८ शतके झळकावली होती.
सर्वात जलद ३२ कसोटी शतके पूर्ण करणारा फलंदाज (डावानुसार)
१७२ – केन विल्यमसन<br>१७४ – स्टीव्ह स्मिथ
१७६ – रिकी पाँटिंग
१७९ – सचिन तेंडुलकर
१९३ – युनूस खान
कसोटी क्रिकेटमधील चौथ्या डावात सर्वाधिक शतके करणारे फलंदाज –
५- केन विल्यमसन
५- युनूस खान
४- ग्रॅम स्मिथ, सुनील गावस्कर, रिकी पाँटिंग, रामनरेश सरवन