Kane Williamson Record SA vs NZ: ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे, ज्यामध्ये किवी संघ प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्यात केन विल्यमसन आणि रचिन रवींद्रच्या जोडीने धुमाकूळ घालत १५० अधिक धावांची भागीदारी रचली आहे. यासह किवी संघ मोठी धावसंख्या रचणार असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान २७ धावा करत विल्यमसनने एक मोठा दुर्मिळ विक्रम आपल्या नावे केला आहे.
रचिन रवींद्रने आधी १०१ चेंडूत १३ चौकार आणि एका षटकारासह १०८ धावा केल्या आणि संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला. तर यानंतर केन विल्यमसननेही त्याचे १५वे वनडे शतक झळकावले आहे. विल्यसमन ९४ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांसह १०२ धावा करत बाद झाला.
न्यूझीलंड संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू केन विल्यमसनने २७ धाव पूर्ण करताच, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९ हजार धावा करणारा न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला. तर सर्वात जलद १९ हजार धावांचा टप्पा गाठणारा चौथा खेळाडू ठरला.
केन विल्यमसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३७० व्या सामन्यात १९ हजार धावा पूर्ण केल्या. विल्यमसनने आतापर्यंत ४४० डाव खेळले असून यादरम्यान त्याची सरासरी ४८.५९ इतकी आहे. विल्यमसनने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ४७ शतकं आणि १०२ अर्धशतकांची नोंद केली आहे. जागतिक क्रिकेटमध्ये हा आकडा गाठणारा केन विल्यमसन हा १६वा खेळाडू आहे.
विल्यमसन व्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा रॉस टेलर आहे, ज्याने ४५० सामन्यांमध्ये एकूण १८,१९९ धावा केल्या आहेत. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर किवी संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू स्टीफन फ्लेमिंगचे नाव आहे, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण १५२८९ धावा केल्या. केन विल्यमसन सर्वात कमी डावात १९ हजार धावा करणारा चौथा खेळाडू ठरला आहे.
न्यूझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
केन विल्यमसन – १९००० हून अधिक धावा
रॉस टेलर – १८,१९९ धावा
स्टीफन फ्लेमिंग – १५,२८९ धावा
ब्रेंडन मॅक्युलम – १४,६७६ धावा
मार्टिन गुप्टिल – १३,४६३ धावा