Kane Williamson Century with Unique Record:न्यूझीलंड वि इंग्लंड तिसऱ्या कसोटीत केन विल्यमसनने इतिहास घडवला आहे. विल्यमसनने कसोटीत ३३वे शतक झळकावले आहे. विल्यमसनचे शतक आणि इतर फलंदाजांच्या महत्त्वपूर्ण धावसंख्येच्या जोरावर दुसऱ्या डावात ४५३ धावा केल्या. यासह न्यूझीलंडने ६५८ धावांची अभेद्य आघाडी मिळवली आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यात केन विल्यमसनने २०४ चेंडूत २० चौकार आणि एका षटकारासह १५६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या सामन्यात शतक पूर्ण करून, विल्यमसन कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात एकाच मैदानावर सलग पाच सामन्यांमध्ये शतक करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला. हॅमिल्टन येथील सेडॉन पार्कमध्ये त्याने ही कामगिरी केली. हा किवी फलंदाज तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात १५६ धावांवर बाद झाला.
केन विल्यमसनचा वर्ल्ड रेकॉर्ड
केन विल्यमसनने हॅमिल्टमनमधील मैदानावर कायमच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या सामन्यापूर्वी विल्यमसनने या मैदानावर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध २०० धावा, २०१९ मध्ये इंग्लंडविरुद्ध १०४ धावा, २०२० मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २५१ धावा आणि यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १३३* धावा केल्या होत्या.
हेही वाचा – WPL Auction मध्ये धारावी झोपडपट्टीत राहणाऱ्या वायरमनच्या लेकीवर कोटींची बोली, ठरली सर्वात महागडी खेळाडू
विल्यमसन विशिष्ट मैदानावर १०० पेक्षा जास्त सरासरी असलेल्या खेळाडूंच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत कोणत्याही एका मैदानावर १०० पेक्षा जास्त सरासरीने धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचे डॉन ब्रॅडमन अव्वल स्थानी आहेत, ज्यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर १२८.५३ च्या जोरदार सरासरीने धावा केल्या आहेत. भारताचे व्हीव्हीएस लक्ष्मण या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत, ज्याने कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर ११०.६३ च्या सरासरीने धावा करण्याचा विक्रम केला आहे. बार्बाडोसमधील किंग्स्टन ओव्हलवर १०४.१५ च्या सरासरीने धावा करणाऱ्या कोणत्याही एका मैदानावर १०० पेक्षा जास्त सरासरीने धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये गारफिल्ड सोबर्सचे नाव देखील समाविष्ट आहे.
या शतकाच्या जोरावर विल्यमसन आता एकाच मैदानावर सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. या बाबतीत त्याने मायकेल क्लार्क (ॲडलेड), जो रूट (लॉर्ड्स) आणि महेला जयवर्धने (गॉल) या महान खेळाडूंची बरोबरी केली आहे. विल्यमसनपेक्षा फक्त शतकं जयवर्धने (११, कोलंबो एसएससी), ब्रॅडमन (९, मेलबर्न), जॅक कॅलिस (९, केपटाऊन) आणि कुमार संगकारा (८, कोलंबो एसएससी) यांनी एकाच मैदानावर अधिक शतकं झळकावली आहेत.