न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यम्सनची प्रतिष्ठित सर रिचर्ड हेडली पदकासाठी चौथ्यांदा निवड झाली आहे. न्यूझीलंडने वार्षिक क्रिकेट पुरस्कारांची घोषणा केली. गेल्या सहा वर्षातील विल्यम्सनचे हे चौथे पदक आहे. तो यंदाचा सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटूही ठरला. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या विल्यम्सनने घरगुती मोसमात केलेल्या शानदार कामगिरीमुळे रेडपाथ चषकासोबत दोन पुरस्कारही मिळवले.

 

विंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या फक्त चार डावांमध्ये विल्यम्सनने 159च्या सरासरीने 639 धावा केल्या. यात त्याच्या 251 धावांच्या खेळीचाही समावेश आहे. त्यानंतर विल्यम्सनने बे ओव्हल येथील बॉक्सिंग डे कसोटीत शतक ठोकले आणि ख्राईस्टचर्च येथे पाकिस्तानविरुद्ध दुहेरी शतक झळकावत न्यूझीलंडला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून दिला.

तर, डेव्हन कॉनवेला त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सत्रात एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडले गेले. करोनामुळे हे पुरस्कार सलग दुसर्‍या वर्षी ऑनलाइन घेण्यात आले.
महिला गटात एमेलिया केरची ड्रीम 11 सुपर स्मॅश आणि आंतरराष्ट्रीय टी-20 महिला पुरस्कारासाठी निवड झाली.

Story img Loader