New Zealand vs England 2nd Test Match Upadates: न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात केन विल्यमसनने न्यूझीलंड संघाला सालरण्याचे काम केले. फॉलोऑन खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाचा डाव ४८३ धावांवर आटोपला. आता इंग्लंडला विजयासाठी २१० धावांची गरज आहे. माजी कर्णधार केन विल्यमसन न्यूझीलंडसाठी तारणहार ठरला, ज्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील २६ वे विक्रमी शतक झळकावले. त्याने २२६ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले.
रॉस टेलर मागे टाकले –
या शतकासह केन विल्यमसन न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. केन विल्यमसनने २८२ चेंडूचा सामना करताना १२ चौकारांच्या मदतीने १३२ धावा केल्या. त्याचबरोबर त्याने रॉस टेलरचा एक विक्रमही मोडला. केन विल्यमसनने आपल्या ९२व्या कसोटी सामन्यात हा पराक्रम केला. यापूर्वी हा विक्रम रॉस टेलरच्या नावावर होता, ज्याने ११२ सामन्यात ४४.६६ च्या सरासरीने ७६८३ धावा केल्या होत्या. केन विल्यमसनच्या नावार आता ७७८७ धावांची नोंद आहे.
टेलरने दिल्या शुभेच्छा –
या कामगिरीबद्दल रॉस टेलरने केन विल्यमसनचे अभिनंदन केले आहे. त्याने ट्विट करून लिहिले, ‘न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या केन विल्यमसनचे अभिनंदन. तुमची ही कामगिरी कसोटी क्रिकेटसाठी तुम्ही किती मेहनती आणि समर्पित आहात याची साक्ष आहे. अजून बरीच वर्षे पुढे बाकी आहेत.’
न्यूझीलंडचे शानदार पुनरागमन –
इंग्लंड संघाच्या पहिल्या डावातील ४३५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव केवळ २०९ धावांतच संपुष्टात आला. त्यांना फॉलोऑन खेळावा लागला. हा सामना आपण सहज जिंकू असे इंग्लंडला नक्कीच वाटले असेल, पण दुसऱ्या डावात प्रथम डेव्हॉन कॉनवे (६१), टॉम ब्लंडेल (९०) आणि टॉम लॅथम (८३) आणि नंतर केन विल्यमसन (१३२) यांनी चांगली फलंदाजी करत न्यूझीलंडचे पुनरागमन केले.
बेन स्टोक्सने न्यूझीलंडला फॉलोऑन देऊन १० वर्षांपूर्वींच्या जुन्या चुकीची पुनरावृत्ती केली आहे का?
या मैदानावर न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा सामना २०१३ मध्ये खेळला गेला होता, त्या वेळी तत्कालीन कर्णधार अॅलिस्टर कुकने न्यूझीलंडला फॉलोऑन दिला होता. पण यजमानांनी दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करत सामना अनिर्णित केला होता. आताही परिस्थिती तशीच दिसते. अशा परिस्थितीत स्टोक्सनेही तीच चूक पुन्हा केली आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इंग्लंडने दुसऱ्या डावात इनफॉर्म बॅट्समन हॅरी ब्रूक आणि जो रूट यांच्या विकेट्स लवकर गमावल्या तर त्यांच्या अडचणी वाढतील.