केन विल्यमसनने न्यूझीलंड कसोटी संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे. न्यूझीलंड क्रिकेट (NZC) ने गुरुवारी सांगितले की, केन विल्यमसनने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून, त्याच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊथी क्रिकेटच्या सर्वात प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर टॉम लॅथम उपकर्णधार म्हणून संघाची धुरा सांभाळेल. केन विल्यमसन मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करत राहणार आहे.
३२ वर्षीय केन विल्यमसनने एक निवेदन जारी करून सांगितले की, वर्कलोडचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापनाशी बोलून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. टीम साऊदी हा न्यूझीलंडचा ३१वा कसोटी कर्णधार असेल. सौदीच्या नेतृत्वाखाली, किवी संघ या महिन्याच्या शेवटी पाकिस्तानचा दौरा करेल, जिथे न्यूझीलंड संघ यजमान संघासोबत २ कसोटी आणि ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळेल. ही मालिका २६ डिसेंबर ते १३ जानेवारी २०२३ पर्यंत चालेल.
केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली किवी संघाने २२ कसोटी सामने जिंकले –
हेही वाचा – ठरलं… Argentina vs France वर्ल्ड कप फायनल! मोरक्कोला २-० ने पराभूत करत फ्रान्सची Final मध्ये धडक
कसोटी कर्णधारपदाची धुरा सांभाळल्यानंतर केन विल्यमसनने ६ वर्षांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. २०१६ मध्ये, त्याच्याकडे ब्रेंडन मॅक्युलमनंतर कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. विल्यमसनने ३८ कसोटी सामन्यांमध्ये किवी संघाचे नेतृत्व केले. यादरम्यान न्यूझीलंडने २२ कसोटी सामने जिंकले. विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने गेल्या वर्षी अंतिम फेरीत भारताचा पराभव करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१ जिंकली होती.