India vs New Zealand, ICC World Cup 2023: न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने कबूल केले की भारताविरुद्धच्या विश्वचषक उपांत्य फेरीत ‘अंडरडॉग’ हा ठपका आमच्या संघाला लावण्यास माझा कोणताही आक्षेप नाही. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीतही भारतीय संघाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याने कौतुक केले. बुधवारी होणाऱ्या पहिल्या उपांत्य फेरीत भारत जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. २०१९ मध्ये उभय संघांमध्ये झालेल्या विश्वचषक उपांत्य फेरीत न्यूझीलंडने विजय मिळवला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या विश्वचषक स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने पत्रकार परिषद घेऊन भारतासमोर कडवे आव्हान असेल असे सांगितले. २०१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत केन विल्यमसनच्या संघ न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव करून उपांत्य फेरीतून बाहेर केले होते. त्याचा बदला भारतीय संघ घेणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भारताने साखळी टप्प्यातील सर्व नऊ सामने जिंकले आहेत. उपांत्य फेरीपूर्वी पत्रकार परिषदेत विल्यमसन म्हणाला, “तुम्ही न्यूझीलंडला नेहमी अंडरडॉग लिहिता यात मी काही आक्षेप घेणार नाही. आम्ही नेहमीच चांगली कामगिरी करत आलेलो आहोत आणि त्यात फारसा बदल झालेला नाही. भारतीय संघाने या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे.” न्यूझीलंडच्या कर्णधाराने पुढे सांगितले की, “उपांत्य फेरीत दोन्ही संघांना समान संधी आहे. भारतीय संघ सर्वोत्तम संघांपैकी एक आहे आणि आम्हाला हे देखील माहित आहे. मात्र, त्या दिवशी आम्ही चांगला खेळ केला तर कोणालाही हरवू शकतो.”

हेही वाचा: Babar Azam: बाबर आझमच्या कर्णधारपदाबाबत कपिल देव यांचे सूचक विधान; म्हणाले, “९९ टक्के लोक म्हणतील त्याला हटवा पण…”

विल्यमसन म्हणाला, “आमच्या बहुतेक खेळाडूंनी या स्टेडियममध्ये आणि इतक्या मोठ्या चाहत्यांसमोर एकही सामना खेळला नाही. त्यामुळे हे आमच्यासाठी कठीण आव्हान असणार आहे. प्रत्येक संघाचा समतोल वेगळा असतो. हार्दिकच्या दुखापतीनंतर भारताचा समतोल थोडासा बिघडला पण त्याचा परिणाम सामन्याच्या निकालावर झाला नाही. भारतीय संघाने उत्तम समन्वय साधला. आमच्या संघाने देखील यापूर्वी असे केले आहे. भारताने इतर संघांच्या तुलनेत आपल्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीची फारशी उणीव जाणवू दिली नाही, त्या-त्या खेळाडूची लवकर भरपाई केली आहे.”

हेही वाचा: IND vs NZ, Semi-Final: डेव्हिड बेकहॅम भारत विरुद्ध न्यूझीलंड सेमीफायनल पाहण्यसाठी सचिन तेंडुलकरबरोबर लावणार हजेरी? जाणून घ्या

आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंड संघाने भारताला नेहमीच अडचणीत आणले आहे. २००३च्या विश्वचषकानंतर २०२३ आयसीसी विश्वचषकाच्या साखळी टप्प्यात न्यूझीलंडला पराभूत करण्यात भारताला यश आले होते. मध्यंतरीच्या २० वर्षांत टीम इंडियाला आयसीसी स्पर्धेतील एकाही सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करता आले नव्हते. २०१९च्या विश्वचषक उपांत्य फेरीत भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला केवळ २३९ धावांत गुंडाळले होते, परंतु भारतीय संघ केवळ २२१ धावाच करू शकला आणि १८ धावांनी सामना गमावून उपांत्य फेरीतून बाहेर पडला होता. आता या विश्वचषकात टीम इंडिया पराभवाचा बदला घेऊ शकते का हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kane williamson showed confidence before the semi final said the underdog thing from what you guys write i dont think much avw