मुंबईची परंपरागत क्रिकेट स्पर्धा ‘कांगा लीग’ गेल्या काही वर्षांमध्ये पूर्णपणे खेळवण्यात आली नव्हती. या पाश्र्वभूमीवर ती बंद होण्याची चिन्हे होती. परंतु त्याऐवजी मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) या स्पर्धेचे ‘मेकओव्हर’ करून तिला ‘संजीवनी’ देण्याची शक्यता आहे. ‘एमसीए’चे अध्यक्ष रवी सावंत यांनी बुधवारी या कांगा लीग स्पध्रेचा ढाचा बदलण्याचे संकेत दिले आहेत. ही स्पर्धा जुलै किंवा ऑगस्ट महिन्याऐवजी सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात येईल.
आगामी मोसमात क्लब क्रिकेट स्पर्धा आयोजनाचा नवा ढाचा कसा असा, याबाबत स्पर्धा संघटकांसाठी बुधवारी विशेष चर्चासत्राचे एमसीएतर्फे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सावंत यांनी पॉवरपॉइंट सादरीकरण करून आगामी वर्षांच्या स्पर्धाबाबतच्या योजना मांडल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे २००९-१० आणि २०१०-११ साली कांगा लीग स्पर्धेचा निकाल लागला नव्हता. त्यामुळे २०११-१२ या वर्षी स्पर्धेला १५ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली, परंतु गेल्या वर्षीसुद्धा ही स्पर्धा निकाली ठरली नव्हती. त्यामुळे यंदाच्या हंगामात ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये खेळवण्याचा ‘एमसीए’चा मानस आहे.
आतापर्यंत ही स्पर्धा ‘डॉ. एच. डी. कांगा लीग’ या नावाने ओळखली जायची. परंतु मैदान क्लब्जशी निगडित संघांना एलिट लीग आणि प्लेट लीग अशा गटांमध्ये विभागण्यात आले आहे. सध्या कांगा लीग स्पध्रेत खेळणारे सर्व संघ एलिट लीगमध्ये खेळतील. या स्पध्रेचे ‘डॉ. एच. डी. कांगा एलिट लीग’ असे नामकरण होण्याची शक्यता आहे. तथापि, कांगा बाद फेरी स्पध्रेत खेळणाऱ्या मैदान क्लब्जसाठीच्या स्पध्रेला ‘एमसीए प्लेट लीग’ असे नाव देण्यात येऊ शकेल.
सादरीकरण कार्यक्रमाप्रसंगी सावंत म्हणाले की, ‘‘मधुसूदन पटवर्धन, शिरीष मल्लापूरकर आणि सुशांत बावडेकर यांनी महिन्याभरात स्पर्धेचा नवीन ढाचा तयार केला आहे. बाद पद्धतीत संघ व्यवस्थापन प्रयोगशील नसते, त्यामुळे नवोदितांना जास्त संधी मिळत नाही. साखळी पद्धतीमध्ये फलंदाज आणि गोलंदाजांना समान संधी मिळेल.’’
डॉ. एच. डी. कांगा स्पर्धेला ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ गटातील दीड दिवसांच्या सामन्यांनी सुरुवात
होईल, ही स्पर्धा ७ सप्टेंबरपासून
१५ डिसेंबपर्यंत होईल, तर ‘ड’
ते ‘ग’ गटातील एकदिवसीय सामने
८ सप्टेंबरपासून ८ डिसेंबपर्यंत संपतील.

Story img Loader