भारताला पहिला-वहिला विश्वचषक पटकावून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सातव्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या मोसमात चमकदार कामगिरी करणाऱ्या फिरकीपटू आर. अश्विनला यावेळी पॉली उम्रीगर पुरस्काराने गौरवण्यात आले.
पुरस्कारानंतर कपिल देव म्हणाले की, ‘‘जेव्हा आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा पुरस्कार आमच्या ध्यानीमनीही नव्हते, त्यावेळी क्रिकेट आमच्यासाठी वेड होते, त्याचाच ध्यास होता. ज्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली मी खेळलो त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो.
यावेळी बीसीसीआयने जीवनज्योत सिंग, इश्वर पांडे, करण शर्मा, अक्षर पटेल, अरमान जाफर, महिला क्रिकेटपटू एम. डी थिरूशकामिनी आणि सवरेत्कृष्ट पंच म्हणून सी. शामशुदीन यांना गौरविले.
पुरस्कार मिळाल्यावर अश्विन म्हणाला की, बीसीसीआयचा पुरस्कार पटकावल्याचा आनंद आहेच, पण इथे उपस्थित असलेल्या मान्यवरांबरोबर उभे राहण्याचा मला जो मान मिळाला, त्याबद्दल मी स्वत:ला सुदैवी समजतो. या पुरस्काराच्या लायक समजल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानतो.
यावेळी कपिल देव यांच्यासह महेंद्रसिंग धोनी आपल्या विश्वचषकांसह एकत्रितपणे दाखल झाले आणि साऱ्यांनाच एक अविस्मरणीय अनुभूती मिळाली. यावेळी एकमेकांचे विश्वचषक हातात घेण्याचा मोह दोघांनाही आवतरता आला नाही.