भारताला पहिला विश्वचषक मिळवून देणारे कपिल देव यांनी बीसीसीआयच्या यो-यो फिटनेस टेस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआयने गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय संघात निवड होण्यासाठी खेळाडूंना यो-यो टेस्ट बंधनकारक केलं होतं. यानंतर अनेक अनफिट खेळाडूंना संघातली जागा गमवावी लागली होती. अफगाणिस्तान कसोटीआधी मोहम्मद शमी, इंग्लंड दौऱ्याआधी अंबाती रायडू आणि भारत अ संघाच्या इंग्लंड दौऱ्याआधी संजू सॅमसन यांना संघातून माघार घ्यावी लागली होती. अंबाती रायडूने आयपीएलमध्ये धावांची बरसात करुनही फिटनेस चाचणीत नापास झाल्यामुळे त्याला संघातून माघार घ्यावी लागली होती, या निर्णयावर अनेकांनी नाराजीही व्यक्त केली होती.

“जर एखादा खेळाडू शाररिकदृष्ट्या तंदुरुस्त असेल तर त्याला संघात जागा मिळाली माहिजे, यासाठी दुसरा कोणताही निकष असता कमा नये. सध्याच्या यो-यो चाचणीचे निकष हे फलंदाजांपेक्षा गोलंदाजांसाठी जास्त सोयिस्कर आहेत. त्यामुळे संघात निवड होताना खेळाडूंची आधीच्या सामन्यांमधली कामगिरी हा एकमेव निकष असायला हवा.” यो-यो फिटनेस चाचणीबद्दल कपिल देव यांनी आपले विचार मांडले.

दिएगो मॅरेडोना हेदेखील जोरात धावत नव्हते. मात्र त्यांच्याकडे बॉल आल्यानंतर त्यांना थांबवण कोणत्याही खेळाडूला शक्य नव्हतं. अशाच प्रकारे प्रत्येक खेळाडूचे वेगवेगळे गुण असतात. पुर्वीच्या काळात सुनिल गावस्कर हे सरावादरम्यान १५ मिनीटाच्या वर कधीही पळत नसत, मात्र प्रत्यक्ष मैदानात त्यांच्याकडे ३ दिवस तग धरुन राहता येईल एवढी ताकद होती. याचप्रमाणे अनिल कुंबळे, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, सौरव गांगुली यांसारखे खेळाडूही फिटनेस चाचणी पास करु शकले नसते.

Story img Loader