आपल्या निधडय़ा व देशप्रेमी स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला माजी कर्णधार कपिल देव यांच्या देशप्रेमाचा आणखी एक किस्सा माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी जळगाव येथे रविवारी रात्री आयोजित एका कार्यक्रमात सर्वापुढे मांडला आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. शारजा येथे १९८६ मध्ये अशिया करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा प्रस्ताव धुडकावून लावत कपिलने त्याला चक्क ‘ड्रेसिंग रुम’ बाहेर हाकलून लावल्याची आठवण वेंगसरकर यांनी येथे सांगितली.
जळगाव येथे मल्टिमिडीया फिचर्स प्रा. लिमिटेडतर्फे आयोजित कार्यक्रमात क्रिकेट समालोचक द्वारकानाथ संझगिरी यांनी वेंगसरकर यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान वेंगसरकर यांनी आपल्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
अशिया करंडक स्पर्धेतील अंतिम सामना १९८६ मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान झाला होता. सामन्यापूर्वी दाऊद इब्राहिम भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये आला. भारताने पाकिस्तानला हरविल्यास आपण सर्व खेळाडूंना ‘टोयोटा करोला’ मोटार भेट देऊ, असे त्याने सांगितले. त्याचवेळी कपिल देव या ठिकाणी आला. दाऊदला पाहून तो संतापला. हा माणूस इथे काय करत आहे असा प्रश्न करत त्याने दाऊदला बाहेर हाकलले. या घटनेमुळे संतापलेल्या दाऊदने हा प्रस्ताव रद्द केल्याचेही म्हटले होते, असे वेंगसरकर यांनी नमूद केले. या घटनेनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना कपिलने ड्रेसिंग रूममध्ये आलेली ही व्यक्ती कोण आहे हे माहित नसल्याचे सांगितले. या रूममध्ये खेळाडू वगळता कोणालाही प्रवेश नसतो. त्यामुळे आपण त्या व्यक्तीला बाहेर हाकलल्याचे त्याने सांगितले. नंतर आपल्याला तो दाऊद असल्याचे सांगण्यात आल्याचे कपिलने म्हटले, असेही वेंगसरकर यांनी नमूद केले.
‘सचिनने दोनशेव्या कसोटीत शून्यावर बाद व्हावे’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा