भारत आणि न्यूझीलंड संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना रायपूर येथे दुपारी १:३० वाजल्यापासून सुरु होणार आहे. मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला आहे. त्यामुळे भारताकडे १-० ने आघाडी आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघात टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत भारताची धुरा हार्दिक पांड्याची हाती आहे. त्यामुळे माजी कर्णधार कपिल देव यांनी हार्दिक पांड्याबाबत एक महत्वाचा इशारा दिला आहे.
टी-२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेचे आयोजन वेस्ट इंडीज आणि अमेरिका करणार आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेपासून रोहित भारतीय टी-२० संघाचा भाग नाही. आगामी टी-२० विश्वचषकासाठी हार्दिकला कर्णधार म्हणून तयारी केले जात आहे, जेणेकरून तो यंग ब्रिगेडसोबत आपली क्षमता दाखवू शकेल. मात्र, भारताचे माजी दिग्गज अष्टपैलू कपिल देव यांनी बीसीसीआयच्या निवडकर्त्यांना हार्दिकबाबत एक इशारा दिला आहे.
बीसीसीआयसाठी हार्दिक हा दीर्घकालीन पर्याय असल्याचे कपिल यांचे मत आहे. त्यामुळे बोर्डाने त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करुन अष्टपैलू खेळाडूला पाठीशी घालणे आवश्यक आहे. त्यांनी गल्फ न्यूजला सांगितले, “मला वाटते की कोणाला जगाकडे पाहण्याची गरज नाही. तुम्ही फक्त तुमची टीम आणि तुमची विचार करण्याची पद्धत पहा. तुम्ही हार्दिकला हे नाही म्हटले पाहिजे की, जर तू एक मालिका हरलास, तर तुला हटवले जाईल.”
हेही वाचा – Brett Lee ने अर्शदीप सिंगला दिला महत्वाचा सल्ला; म्हणाला, ‘त्याने जिममध्ये…’
कपिल देव पुढे म्हणाले, ”जर तुम्ही एखाद्याला कर्णधार बनवले तर तुम्हाला त्याला वेळ द्यावा लागेल. जेणेकरून तो कामगिरी करू शकेल. तो चुका करेल पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ते दोष पाहून नये. चुका करण्यापेक्षा तो संघाला पुढे नेण्यास तयार आहे की नाही यावर लक्ष केंद्रित करावे. तसेच भविष्याकडे पहा. तुम्ही प्रत्येक मालिकेनुसार याकडे पाहू नये.”
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या गेल्या अनेक महिन्यांपासून त्याच्या फलंदाजी-गोलंदाजीसोबतच कर्णधारपदावरूनही चर्चेत आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याने तीन टी-२० मालिकांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे आणि त्या सर्व जिंकल्या आहेत. हार्दिकच्या नेतृत्वाखाली, भारताने अलीकडेच घरच्या टी-२० मालिकेत श्रीलंकेचा ३-० असा पराभव केला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स प्रथमच आयपीएल चॅम्पियन बनण्यात यशस्वी ठरला.