भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा जागतिक क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंमध्ये समावेश होतो. भारतीय संघाला पहिलावहिला विश्वचषक जिंकून देण्याची किमया कपिल देव यांनी केली होती. ‘मैदानावर असताना कपिल देव फक्त आणि फक्त क्रिकेटवरती लक्ष केंद्रित करत. तिथे त्यांची प्रत्येक गोष्ट अचून असायची. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र, कपिल अजिबात वेळ पाळत नाहीत’, असा खुलासा त्यांच्या पत्नीने केला होता.
कपिल देव यांची पत्नी रोमी भाटियाने ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या कार्यक्रमामध्ये खासगी आयुष्यातील अनेक मजेशीर गोष्टी सांगितल्या होत्या. कार्यक्रमामध्ये कपिल देव आणि रोमीच्या लग्नाचा फोटो दाखवण्यात आला. त्यात रोमी कपिल देवकडे रागात बघत असल्याचे दिसत होते. सुत्रसंचालक कपिल शर्माने रोमीला याबाबत विचारले. यावर रोमीने उत्तर दिले की, कपिल देव स्वत:च्या लग्नात उशीरा पोहचले होते. इतकेच नाही तर मुलच्या जन्माच्यावेळी देखील त्यांना उशीर झाला होता.
हेही वाचा – VIDEO : विराटने जॉनी बेअरस्टोला दिला ‘फ्लाइंग किस’! सोशल मीडियावर रंगली चर्चा
याशिवाय कपिल देव यांनी हनीमुनचा देखील एक किस्सा सांगितला होता. लग्नानंतर ते पत्नी रोमीसोबत थेट इंग्लंडला गेले होते. तिथे रोमीने राजमा बनवण्याचा प्रयत्न केला. रोमीला स्वयंपाक घरात सोडून कपिल देव आणि मोहिंदर अमरनाथ व्यायामासाठी गेले होते. भारतातील स्वयंपाक्याने फोनवर सांगितल्यानुसार रोमीला कुकरच्या दोन शिट्ट्या घ्याव्या लागणार होत्या. मात्र, पहिल्या शिट्टीतच संपूर्ण स्वयंपाक घर घराब झाले होते.