भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर ‘कॉफी विथ करण’ या शो मध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे बंदी घालण्यात आली होती. ही बंदी गुरुवारी उठवण्यात आली. BCCI च्या CoA ने हा निर्णय घेतला. ही बंदी तत्काळ प्रभावाने उठवण्यात आली असून न्यूझीलंड दौऱ्यासाठी हार्दिकचा संघात समावेश करण्यात आला आहे, तर राहुलला ‘भारत अ’ संघात संधी देण्यात आली आहे. या सर्व वादावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. पण आता हा वाद कुठे तरी शमताना दिसत असताना त्या शोचा मुलाखतकार आणि दिग्दर्शक करण जोहर याने एक खुलासा केला आहे.
हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्याबाबत जे काही घडले त्यामुळे करणची आई अत्यंत नाराज आणि निराश होती. त्यांनी करणला खडे बोल सुनावले. करणनेच याची माहिती दिली. ‘हा सर्व प्रकार घडल्यानंतर आई माझ्यावर अत्यंत नाराज झाली. ती हार्दिक पांड्याची मोठी चाहती आहे. त्यामुळे ती मला कायम विचारत होती की मी त्यांच्यासोबत असे का केले? ती माझ्यावर रागावली होती. त्यावर मी नेहमी तिला सांगत असायचो की मी यात काहीही केलेले नाही. पण तिने मात्र मलाच त्याबाबत जबाबदार धरले, असे करण म्हणाला. त्याच्या आईच्या त्या वागण्यामुळे तो दुखावलो गेला, असेही करण म्हणाला.
‘मला मान्य आहे की हार्दिक आणि लोकेश यांनी काही आक्षेपार्ह विधाने केली. पण या साऱ्या प्रकारात त्यांना खूप कठोर वागणूक देण्यात आली. आता मात्र त्या दोघांना क्रिकेट खेळू दिले पाहिजे’, असेही करण म्हणाला.
दरम्यान, या दोघांवरील बंदी तात्पुरती मागे घेण्यात आली आहे. पण त्यांना चौकशीपासून पळता येणार नसून लोकपाल (होमडसमन) नेमल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. पांड्या-राहुल प्रकरणी सुप्रीम कोर्टात ५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.