स्वसंरक्षणासाठी हल्ली प्रत्येक जण कराटे, ज्युदो किंवा तायक्वांडो यांसारख्या खेळांकडे वळत असतो. पण कराटे आणि बॉक्सिंगचे मिश्रण असलेला ‘किकबॉक्सिंग’ हा खेळ सध्या सर्वाच्या पसंतीस उतरू लागला आहे. कराटेमधील ब्ल्यू बेल्ट, ब्लॅक बेल्ट मिळवणाऱ्या खेळाडूंनी मार्शल आर्टचा अत्याधुनिक प्रकार असलेल्या किंकबॉक्सिंग खेळाचा शोध लावला. जपानमध्ये १९६०च्या दशकात हा खेळ खेळण्यास सुरुवात झाल्यानंतर भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात २०००सालापासून या खेळाचा श्रीगणेशा झाला.
हातात बॉक्सिंगचे ग्लोव्हज् तसेच पायात मऊ आणि वजनाने हलके बूट घालून खेळण्यात येणाऱ्या किकबॉक्सिंगची पहिली स्पर्धा २०००मध्ये पिंपरी-चिंचवडला भरवण्यात आली. त्यानंतर २००१मध्ये कल्याण येथे राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अधिकाधिक भागात हा खेळ पोहोचवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय किकबॉक्सिंग महासंघासह (वाको), महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनने कंबर कसली आहे. २००२पासून सलग तीन वर्षे सोलापूरमध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद उत्स्फूर्त होता. २००४मध्ये राज्यातील २८ जिल्ह्य़ांमध्ये हा खेळ पोहोचवण्यात महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनला यश आले होते. सद्यस्थितीला ३२ जिल्ह्य़ांमध्ये हा खेळ खेळला जात आहे. खेडय़ापाडय़ात तसेच महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळांमध्ये हा खेळ पोहोचवण्याचा त्यांचा
प्रयत्न आहे.
‘‘बॉक्सिंगची रिंग आणि लोकांमध्ये असलेली भीती, यामुळे हा खेळ जनमानसात पोहोचवण्यात सुरुवातीला आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या. स्फोटक आणि असुरक्षित अशी या खेळाची प्रतीमा तयार झाली होती. पण कराटे आणि ज्युदो या खेळांपेक्षा हा खेळ अधिक सुरक्षित आहे, याबाबत आम्ही जागरूकता निर्माण केली. लोखंडापासून किंवा लाकडापासून बॉक्िंसगची रिंग बनवून आम्ही स्पर्धा घेतल्या. त्याचबरोबर दातांचे सुरक्षाकवच, हातातले ग्लोव्हज् आणि पायातले हलके शूज ही सुरक्षासामग्री आम्ही परदेशातून आयात करून घेतली. आता राज्यासह देशभरात या खेळाचा प्रचार आणि प्रसार जोमाने सुरू आहे,’’ असे ‘वाको’चे अध्यक्ष सी. ए. तांबोळी यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताने किकबॉक्सिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. डिसेंबर २०१२मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत चमक दाखवणाऱ्या खेळाडूंना विशेष ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर गेल्या वर्षी झालेल्या आशियाई इन्डोअर स्पर्धेत भारताने या खेळात १८ पदके मिळवली. त्यात महाराष्ट्राचा वाटा होता १३ पदकांचा. आता २०१९मध्ये व्हिएतनाम येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत किकबॉक्सिंगचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी खेळाडूंना महाराष्ट्रातच अद्ययावत प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये होणाऱ्या सॅफ क्रीडा स्पर्धेत किकबॉक्सिंगचा समावेश करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही तांबोळी म्हणाले.
खेळाचे नियम
*जपान आणि अमेरिकन किकबॉक्सिंगचे नियम वेगवेगळे आहेत. पण सर्वसाधारण नियम जवळपास सारखेच आहेत. खेळाडूंना दातासाठी सुरक्षाकवच, हाताचा पट्टा, बॉक्सिंग ग्लोव्हज्, गुडघ्याचा पट्टा, किकबॉक्सिंगसाठीचे बूट आणि हेल्मेट (फक्त १६ वर्षांखालील हौशी खेळाडूंसाठी) घालून रिंगणात उतरावे लागते.
*प्रतिस्पध्र्याना एकमेकांच्या कंबरेच्या वरती लाथा आणि पंचेस मारण्याची मुभा आहे. गुडघ्याचा आणि कोपराचा वापर करण्यावर बंदी असते. क्वचितप्रसंगी हनुवटीचा वापर केला जातो.
*आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंगमध्ये हौशी खेळाडूंसाठी ३ ते ५ फेऱ्या असतात. व्यावसायिक खेळाडूंसाठी हे प्रमाण ३ ते १२ फेऱ्यांपर्यंत जाते. प्रत्येक फेरी २ मिनिटांची झाल्यानंतर एक मिनिटाची विश्रांती दिली जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा