२० वर्षांपूर्वी मी कारगिलच्या भूमीवर गेलो होतो. त्यावेळी युद्ध सुरु होते. शत्रू उंच शिखरावरून आपल्या जवानांवर हल्ला चढवत होता. पण त्यावेळी प्राणाची काळजी न करणाऱ्या आपल्या जवानांना आपला राष्ट्रध्वज उंच शिखरावर जाऊन सर्वप्रथम रोवायचा होता. मी तेथील मातीला नमन केले. त्यावेळी कारगिलची भूमी ही मला एखाद्या तिर्थक्षेत्रासारखी वाटत होती, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या. कारगिल विजय दिवसाला २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
कारगिलच्या युद्धात स्वतःच्या प्राणांचे बलिदान देण्याऱ्या शहीद वीर जवानांना मी आदरांजली अर्पण करतो. अशा शूरवीर योद्धांना जन्म दिलेल्या मातांनाही मी प्रणाम करतो. आपण प्रत्येकानेच शहीद झालेल्या जवानांना नमन केले पाहिजे. कारगिलचा विजय हा आपल्या भविष्यात येणाऱ्या पिढ्यांसाठी एक प्रेरणा आहे. अशा सर्वोच्च बलिदानाला मी सलाम करतो.
गेल्या ५ वर्षात जवान आणि शहिदांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याच्या दृष्टीने अनेक कल्याणकारी निर्णय घेण्यात आले. दशकांपासून प्रलंबित असलेली वन रँक वन पेन्शन योजना आम्ही अंमलात आणली. याशिवाय आम्ही शहीद जवानांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यासंदर्भातही अनेक निर्णय घेतले, अशी माहितीही त्यांनी दिली.
आता अवकाशदेखील युद्धभूमी होत आहे. त्याशिवाय सायबरयुध्दांचाही काळ आला आहे. त्यामुळे आपल्या बचाव पथकांना अद्ययावत आणि अत्याधुनिक सोयी देणे ही केवळ गरजच उरली नाही, ती बाब प्राधान्याने केली जाणे गरजेचे आहे आणि आमही त्याकडे लक्ष पुरवले आहे. अत्याधुनिक यंत्रणा ही आपल्या बचाव पथकांची ओळख बनायला हवी, असेही मोदी यांनी सांगितले.
सध्या युद्धाचे स्वरूप बदलले आहे. मानवता आणि विश्व त्या युद्धाच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. दहशतवाद मानवतेला आव्हान देत आहे. त्यामुळे जे युद्धात पराभूत झाले आहेत, ते दहशतवादाला पाठबळ देऊन अशा पद्धतीने आपल्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दात मोदी यांनी नाव न घेता दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या राष्ट्रांना खडे बोल सुनावले.