आक्षेपार्ह चित्रफीतीद्वारे धमकावल्याप्रकरणी कारवाई
आक्षेपार्ह चित्रफीत दाखवून धमकावण्याच्या घोटाळ्यातील कथित सहभागाप्रकरणी फ्रान्सचा फुटबॉलपटू करीम बेन्झेमाला राष्ट्रीय संघातून डच्चू देण्यात आला आहे. या प्रकरणाने पीडित मॅथियू व्हलब्युएनाची मानसिक स्थिती योग्य नसल्याने त्यालाही संघात समाविष्ट करण्यात आलेले नाही. फ्रान्सचा संघ १३ नोव्हेंबरला जर्मनीविरुद्ध तर १७ नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे.

फ्रान्स तसेच रिअल माद्रिद क्लबचा प्रमुख आधारस्तंभ असलेल्या बेन्झेमाची सहकारी खेळाडूवर मानसिक दबाव टाकल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. लैंगिक गोष्टींचा समावेश असलेल्या चित्रफीतीद्वारे व्हलब्युएनावर दडपण आणून त्याच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप बेन्झेमावर आहे. याप्रकरणातील सहभागामुळे बुधवारची रात्र तुरुंगात घालवल्यानंतर बेन्झेमा व्हर्सलिस येथील न्यायालयासमोर हजर झाला. दरम्यान, फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिअर देसचॅम्प्स यांनी फुटबॉलव्यतिरिक्त कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. देसचॅम्प्स आणि बेन्झेमा यांच्यातील संबंध याआधीच दुरावलेले आहेत.

Story img Loader