पॅरिस : फुटबॉल विश्वातील प्रतिष्ठेच्या बॅलन डी’ओर पुरस्काराचा यंदाचा मानकरी फ्रान्सचा आघाडीपटू करीम बेन्झिमाने सोमवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. दुखापतीमुळे बेन्झिमा या वर्षीच्या विश्वचषक स्पर्धेत खेळू शकला नाही.
विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यानंतर चोवीस तासांत बेन्झिमाने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केले. विश्वचषक अंतिम फेरीतील पराभवाचा धक्का चाहते पचवत नाही तोच त्यांना बेन्झिमाच्या निवृत्तीचा दुसरा धक्का त्यांना बसला. ३५ वर्षीय बेन्झिमाने ९७ सामन्यांत फ्रान्सचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये त्याने ३७ गोल नोंदवले. रेयाल माद्रिदकडून क्लब फुटबॉल खेळणाऱ्या बेन्झिमाने २८ मार्च २००७ मध्ये ऑस्ट्रियाविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यातून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर २००८च्या युरो अजिंक्यपद स्पर्धेच्या पात्रता फेरीत बेन्झिमाने फेरो द्वीपसमूहाविरुद्ध फ्रान्ससाठी कारकीर्दीतील पहिला गोल केला.
सोमवारी ट्विटरच्या माध्यमातून बेन्झिमाने निवृत्तीची घोषणा केली. ‘‘मी आज जेथे कुठे आहे तेथे पोचण्यासाठी अथक प्रयत्न केले, तशाच काही चुकाही केल्या. मला याचा अभिमान आहे. मी माझी कहाणी लिहिली आणि आज त्याचा शेवट होत आहे,’’ असे बेन्झिमाने आपल्या ‘ट्वीट’मध्ये लिहिले.