पॅरिस : फ्रान्स आणि रेयाल माद्रिदचा आघाडीचा फुटबॉलपटू करीम बेन्झिमा प्रतिष्ठेच्या बॅलन डी’ओर पुरस्काराचा मानकरी ठरला. गतहंगामात बेन्झिमाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे रेयालने चॅम्पियन्स लीग आणि ला लिगा फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. या पुरस्काराचा गतविजेता लिओनेल मेसीला अव्वल २५ खेळाडूंमध्येही स्थान मिळाले नाही, तर माजी विजेता ख्रिस्टिआनो रोनाल्डो २०व्या स्थानी राहिला.

रेमंड कोपा, मिशेल प्लॅटिनी, जीन-पिएर पापिन आणि झिनेदिन झिदान यांच्यानंतर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावणारा बेन्झिमा हा फ्रान्सचा पाचवा खेळाडू ठरला. बेन्झिमाने गेल्या हंगामात ४६ सामने खेळताना ४४ गोल केले, यात चॅम्पियन्स लीगमधील १५ गोलचा समावेश होता. गेल्या हंगामात युएफा नेशन्स लीग जिंकणाऱ्या फ्रान्सच्या संघात बेन्झिमाचा समावेश होता. त्यामुळे सेनेगल व बायर्न म्युनिकचा सादिओ माने, तसेच बेल्जियम व मँचेस्टर सिटीचा केव्हिन डीब्रूएने यांना मागे टाकत बेन्झिमाने बॅलन डी’ओरच्या पुरस्कारावर मोहोर उमटवली.

फ्रान्स फुटबॉल मासिकाच्या वतीने १९५६ सालापासून सर्वोत्तम फुटबॉलपटूला बॅलन डी’ओर पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदा प्रथमच केवळ गतहंगामातील कामगिरीच्या आधारे हा पुरस्कार देण्यात आला. यापूर्वी एका वर्षांतील कामगिरी ग्राह्य धरली जात होती. बेन्झिमाने गतहंगामात सर्व स्पर्धामध्ये आपली छाप पाडली. एका अश्लिलचित्रफीतीच्या प्रकरणात अडकल्याने त्याला जवळपास पाच वर्षे फ्रान्स संघाबाहेर ठेवण्यात आले होते. चौकशीनंतर त्याच्यावरील कारवाई एक वर्षांसाठी करण्यात आली होती. या बंदीतून बाहेर आल्यावर गेल्या वर्षी बेन्झिमा युरो अजिंक्यपद स्पर्धेत खेळला आणि यंदाच्या विश्वचषकातही तो फ्रान्सचे प्रतिनिधित्व करेल.

या पुरस्काराचा पहिला विजेता स्टॅनले मॅथ्यूनंतर (१९५६) हा पुरस्कारा पटकावणारा बेन्झिमा दुसरा वयस्त खेळाडू ठरला. महिलांमध्ये स्पेनची अलेक्सिया पुतेयास या पुरस्काराची मानकरी ठरली.

Story img Loader