यजमान महाराष्ट्र पुरुष व महिला गटात संभाव्य विजेता मानला जात असला तरी त्यांना नशिबाची साथही चांगली मिळत आहे. प्रतिस्पर्धी संघ अनुपस्थित राहिल्यामुळे महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंना येथील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत लागोपाठ दोन सामन्यांमध्ये पुढे चाल मिळाली आहे. महाराष्ट्राच्या पुरुषांनाही एका सामन्यात पुढे चाल मिळाली आहे. याचप्रमाणे दिल्ली, कर्नाटक या बलाढय़ संघांनी येथील विजयी वाटचाल कायम राखली आहे. विद्या प्रतिष्ठानच्या क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेतील महिला गटात महाराष्ट्रास पहिल्या दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे त्रिपुरा व सिक्कीम यांच्याकडून पुढे चाल मिळाली. पुरुषांमध्ये सिक्कीमची अनुपस्थिती महाराष्ट्राच्या पथ्यावर पडली आहे. लागोपाठ दोन दिवस त्यांना विश्रांती मिळाली आहे.
पुरुष गटात विदर्भ संघाने ओडिशाचा १४-१० असा पराभव केला. त्यावेळी विजयी संघाकडून आशीष कागदे याने दोन मिनिटे पळती व चार गडी बाद करीत अष्टपैलुत्व सिद्ध केले. त्याला नीलेश पारधे (साडेतीन मिनिटे पळती) याने चांगली साथ दिली. रेल्वे क्रीडा मंडळाने मध्य प्रदेशवर २७-५ असा दणदणीत विजय मिळविला, त्यावेळी रेल्वे संघाच्या अमोल जाधव ४ मिनिटे २० सेकंद व तीन गडी, पी. आनंदकुमार (२ मिनिटे व पाच गडी) यांचा खेळ अष्टपैलू झाला. दिल्ली संघाने गोव्याचा १६-१५ असा चुरशीच्या लढतीत पराभव केला.
दिल्ली संघास पहिल्या लढतीत आसामकडून पुढे चाल मिळाली होती. पुडुचेरी संघाने आव्हान राखताना चंडीगढ संघाला २५-१४ असे पराभूत केले.
महिलांमध्ये कर्नाटक संघाने गुजरात संघाचा ११-१ असा धुव्वा उडविला, तर पश्चिम बंगालने नागालँड संघाचा ११-३ असा पराभव केला. दिल्ली संघाने बिहार संघाला ११-३ असे हरविले. ओडिशा संघाने छत्तीसगड संघाला १४-११ असे पराभूत केले.
प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद!
बारामती परिसरात खो-खो या खेळाची लोकप्रियता भरपूर असल्यामुळेच येथे प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांची गॅलरी खचाखच भरली असल्याचे दिसून आले. त्यांना सामन्यांचा आनंद मिळावा यासाठी तीन-चार ठिकाणी मोठे पडदे लावण्यात आले आहेत. त्यावर सामन्यांचे थेट प्रक्षेपण दाखविले जात आहे. खेळाडूंच्या कौशल्यास ते भरभरून दादही देत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा