महाराष्ट्राविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर कर्नाटक रणजी करंडकावर नाव कोरणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. शुक्रवारी त्यांनी पहिल्या डावात ७ बाद ४७४ धावा करीत १६९ धावांची आघाडी मिळवली आहे. या आघाडीमुळे महाराष्ट्राच्या विजेतेपदाच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत. काही चमत्कार घडला तरच ते विजेतेपद मिळवू शकतील.
महाराष्ट्राने पहिल्या डावात ३०५ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना कर्नाटकच्या फलंदाजांनी आत्मविश्वासाने खेळ करीत रणजी करंडकावर आपले नाव कोरण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. लोकेश राहुलचे शतक तर रॉबिन उथप्पाच्या दमदार ७२ धावा हे त्यांच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. महाराष्ट्राकडून त्यांचा मुख्य गोलंदाज समद फल्लाहला तीन बळी मिळाले, हीच जमेची बाजू ठरली. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी त्यांनी कमी चुका केल्या.
कर्नाटकने बिनबाद २३० धावसंख्येवरून शुक्रवारी पहिला डाव पुढे सुरू केला. त्या वेळी महाराष्ट्राची पहिल्या डावातील ३०५ धावसंख्या ते सहज पार करतील, याबाबत कोणालाही शंका नव्हती. त्यांनी शतकवीर गणेश सतीशला प्रारंभीच गमावले. चिराग खुराणाने त्याचा त्रिफळा उडवत पहिला धक्का दिला. गणेशने १६ चौकारांसह ११७ धावा केल्या. त्याने लोकेश राहुलच्या साथीने २१६ धावांची भर घातली. महाराष्ट्राने गुरुवारी किमान दहा झेल सोडले तर धावचीत करण्याच्या तीन-चार संधी दवडल्या नसत्या तर हा सामना कर्नाटकसाठी अवघड झाला असता, याचा प्रत्यय येथे शुक्रवारी अनेकदा आला. मात्र तोपर्यंत सामन्याचे पारडे कर्नाटकच्या बाजूने झुकले होते.
या स्पर्धेतील अन्य सामने व अंतिम सामने यामध्ये खूपच मोठा फरक असतो, याची जाणीवच महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये बहुतांश वेळा दिसून आली नाही. त्यांच्या खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी आवश्यक असणाऱ्या अव्वल दर्जाच्या देहबोलीचा अभावच दिसून आला. कर्नाटकने यापूर्वी सहा वेळा ही स्पर्धाजिंकली आहे, तर २००९-१०मध्ये त्यांना अंतिम फेरीत निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळेच की काय त्यांच्या फलंदाजांमध्ये विजेतेपद मिळविण्याचा आत्मविश्वास दिसून आला. गणेशच्या जागी आलेल्या रॉबिन उथप्पा आणि राहुलने निवड समितीचे लक्ष वेधून घेणारी कामगिरी केली. राहुलने या मोसमातील तिसरे शतक पूर्ण करताना या स्पर्धेतील यंदाचा एक हजार धावांचा टप्पाही ओलांडला. त्याने १० सामन्यांमध्ये १६ डावांमध्ये ही कामगिरी केली. यापूर्वी कर्नाटककडून विजय भारद्वाजने एका मोसमात एक हजार धावांचा टप्पा ओलांडला होता.
उपाहारापूर्वी कर्नाटकने राहुलची विकेट गमावली. श्रीकांत मुंढेच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक रोहित मोटवानीने त्याला टिपले. राहुलने १३ चौकार व दोन षटकारांसह १३१ धावा करीत लक्षवेधक कामगिरी केली. त्याने उथप्पाच्या सोबत शतकी भागीदारी केली. पहिल्या सत्रात कर्नाटकने ३३ षटकांत ११३ धावांची भर घालताना आघाडीही मिळविली. मुंबईविरुद्धच्या लढतीत पहिल्या डावावर पिछाडीवर असताना महाराष्ट्राने दुसऱ्या डावात सामना फिरवीत सनसनाटी विजय मिळविला होता. ही आठवण ताजी असल्यामुळेच कर्नाटकने दुसऱ्या सत्रात खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी करण्याचा पवित्रा घेतला. खेळपट्टीवर टिकून राहिले की धावा आपोआपच मिळतात, हा दृष्टिकोन ठेवत त्यांनी खेळ केला. उथप्पाने अर्धशतक पूर्ण केले. मात्र ७२ धावा काढून तो तंबूत परतला. त्यामुळे त्याचा खेळ पाहण्यासाठी आलेल्या त्याच्या मोजक्या चाहत्यांची निराशाच झाली. या सत्रात महाराष्ट्राच्या समद फल्लाहने एकाच स्पेलमध्ये मनीष पांडे (३६) व चिदंबरम गौतम (७) यांना बाद करत खळबळ उडवली होती. मात्र या धक्क्यांचा फारसा परिणाम कर्नाटकच्या डावावर झाला नाही. कारण तोपर्यंत कर्नाटकने आपली बाजू बळकट केली होती. खेळपट्टीबाबत चिंता करण्यासारखे काहीही नाही, हेच त्यांच्या फलंदाजांनी दाखवून दिले. करुण नायर (४४) व अमित वर्मा (२९) यांनी शेवटच्या सत्रातील कंटाळवाण्या खेळांत रंग भरण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठी भागीदारी रचण्यापूर्वीच ते बाद झाले.
धावफलक
महाराष्ट्र (पहिला डाव) : ३०५
कर्नाटक(पहिला डाव) : १५८ षटकांत ७ बाद ४७४ (रॉबिन उथप्पा ७२, लोकेश राहुल १३१, गणेश सतीश ११७, करुण नायर ४४; समाद फल्लाह ३/७४, श्रीकांत मुंढे २/८९, चिराग खुराणा २/११०).
‘भारताचा पोलादी फलंदाज’ म्हणून ख्याती मिळविलेल्या राहुल द्रविडचाच आदर्श माझ्यापुढे आहे. त्याच्याकडून मला फलंदाजीबाबत अनेक बहुमोल सल्ले मिळाले आहेत. त्याचाच पाठपुरावा मी करीत असतो. द्रविड यांच्याप्रमाणेच भारतीय संघाचा अविभाज्य घटक होण्याचे माझे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे. यंदा या स्पर्धेत एक हजार धावांचा टप्पा ओलांडल्यामुळे मला खूप समाधान वाटत आहे. त्यातही संघाच्या विजेतेपदात माझा खारीचा वाटा असेल याचा आनंद काही वेगळाच असणार आहे.
-लोकेश राहुल