भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून खेळवल्या जाणाऱ्या १९ वर्षांखालील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत कर्नाटकच्या एका खेळाडूने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कूच बिहार चषकाच्या अंतिम सामन्यात कर्नाटकचा सलामीवर प्रखर चतुर्वेदी याने मुंबईविरोधात नाबाद ४०४ धावांची खेळी साकारली आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने २० वर्षांपूर्वी इंग्लंडविरोधात नाबाद ४०० धावांची खेळी साकारली होती. लाराचा तो विक्रम आजही अबाधित आहे. प्रखरच्या या खेळीने सर्वांना लाराच्या इंग्लंडविरोधातल्या खेळीची आठवण करून दिली.
मुंबई आणि कर्नाटकचे संघ कूच बिहार चषकाच्या अंतिम फेरीत धडकले होते. उभय संघांमधील सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ३८० धावा फटकावल्या होत्या. त्याविरोधात खेळणाऱ्या कर्नाटकच्या संघाने प्रखर चतुर्वेदीच्या नाबाद ४०४ धावांच्या खेळीच्या जोरावर ८ गड्यांच्या बदल्यात ८९० धावांचा पर्वत उभा केला. या चार दिवसीय क्रिकेट सामन्यात दोनच डाव खेळवता आले. दरम्यान, हा सामना अनिर्णित राहिला. प्रखरने ६३८ चेंडूत तब्बल ४६ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४०४ धावांची बलाढ्य खेळी साकारली. यासह प्रखर हा कूच बिहार चषकात एका डावात ४०० धावा फटकावणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
दरम्यान, या सामन्यात प्रखरने ९ व्या विकेटसाठी समर्थ एन. च्या साथीने नाबाद १७३ धावांची भागीदारी केली. समर्थने १३५ चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या. प्रखरव्यतिरिक्त हर्शिल थरमानी याने या सामन्यात १६९ धावांची शतकी खेळी साकारली. तसेच कार्तिकेय के. पी. (७२), हार्दिक राज (५१) आणि कार्तिक एसयू (५०) या तिघांनी अर्धशतकं ठोकली.
राहुल द्रिवडच्या मुलाची कमाल
भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा मुलगा समित द्रविड यानेदेखील या सामन्यात कर्नाटकचं प्रतिनिधित्व केलं होतं. समितने केवळ २२ धावा करून बाद झाला. मात्र गोलंदाजीत त्याने १९ षटकांत दोन बळी घेतले.
हे ही वाचा >> IND vs AFG: रोहित शर्माच्या खराब फलंदाजीवर आकाश चोप्राने केले प्रश्न उपस्थित; म्हणाला, “त्याच्या फॉर्म आणि क्षमतेबद्दल शंका…”
युवराज सिंहचा विक्रम मोडीत
कूच बिहार चषक स्पर्धा ही नवोदित खेळाडूंसाठी खूप महत्त्वाची असते. या स्पर्धेत चार दिवसीय सामने खेळवले जातात. तरुण खेळाडूंना रणजी क्रिकेटमधील पदार्पणाआधी या स्पर्धेद्वारे आपली चुणूक दाखवण्याची संधी मिळते. सचिन तेंडुलकर, युवराज सिंहसारखे क्रिकेटपटू या स्पर्धेतूनच नावारुपाला आले होते. युवराज सिंह याने २००० साली खेळवण्यात आलेल्या कूच बिहार चषक स्पर्धेत ३५८ धावांची खेळी साकारली होती. त्याचा हा विक्रम आज २३ वर्षांनंतर कर्नाटकच्या प्रखर चतुर्वेदीने मोडित काढला.