कर्नाटकने ३२० गुणांसह कुमारांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. त्यांनी मुलांच्या १२ व १० वर्षांखालील मुले तसेच १२ वर्षांखालील मुलींमध्ये सांघिक विजेतेपदही पटकाविले.
शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने १० वर्षांखालील मुलींमध्ये सांघिक विजेतेपदाची कमाई केली. तसेच त्यांनी १७ वर्षांखालील मुलांमध्ये सांघिक अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेत कर्नाटकने १४ वर्षांखालील मुले व मुली तसेच १७ वर्षांखालील मुलींमध्ये सांघिक विजेतेपद मिळविले. सवरेत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक मुलांमध्ये एस. पी. लिकित (१७ वर्षे), सी. जे. संजय (१४ वर्षे), तन्मय दास (१२ वर्षे), शोन गांगुली (१० वर्षे) यांना मिळाले. मुलींमध्ये केनिषा गुप्ता (१२ वर्षे), संजीती साह (१० वर्षे), माना पटेल (१७ वर्षे) व रायना सलढाणा (१४ वर्षे) यांनी सवरेत्कृष्ट खेळाडूचा मान मिळविला.
पुण्याच्या आर्या राजगुरू हिने शेवटच्या दिवशी १७ वर्षांखालील गटात ५० मीटर बटरफ्लाय शर्यतजिंकून कौतुकास्पद कामगिरी केली. तिने हे अंतर २९.९२ सेकंदांत पार केले. मुंबईच्या रायना सलढाणा हिने शेवटच्या दिवशी स्वत:चे सातवे सुवर्णपदक जिंकून कौतुकास्पद कामगिरी केली. तिने ८०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत सुवर्णपदक मिळविताना हे अंतर ९ मिनिटे २९.४२ सेकंदांत पार केले. तिने वैयक्तिक प्रकारात पाच व रिले शर्यतीत दोन सुवर्णपदके जिंकली. तिची सहकारी संजीनी साह हिने १४ वर्षांखालील गटात ५० मीटर फ्रीस्टाईल शर्यत ३१.७२ सेकंदांतजिंकली. याच शर्यतीत पलक धामी या महाराष्ट्राच्या खेळाडूला रौप्यपदक मिळाले. अंतिम दिवशी महाराष्ट्राच्या वेदांत बाफना (५० मीटर बॅकस्ट्रोक),
अन्वेष प्रसादे (५० मीटर फ्रीस्टाईल) यांनी रौप्यपदक, तर युगा बिरनाळे हिने ५० मीटर बटरफ्लायमध्ये कांस्यपदक पटकाविले.
वॉटरपोलोत महाराष्ट्राच्या मुलींना रौप्य, मुलांमध्ये कांस्यपदक
वॉटरपोलोत महाराष्ट्राच्या मुलींना अंतिम फेरीत पराभवास सामोरे जावे लागले. त्यांना बंगालने ५-२ असे हरविले. त्या वेळी बंगालकडून अनीषा साह, अनुशीर दास, तमाली नासकर, कलंत्री मित्रा व पियाली सांत्रा यांनी प्रत्येकी एक गोल केला. महाराष्ट्राकडून निशा बोंडे व पूजा कुंबरे यांनी प्रत्येकी एक गोल करीत चांगली लढत दिली. बंगालने मुलांमध्येही विजेतेपद मिळवीत दुहेरी मुकुट पटकाविला. त्यांनी अंतिम लढतीत केरळला ३-२ असे चुरशीच्या लढतीनंतर पराभूत केले. विजयी संघाकडून जोयदीप साह, दीपांकर सरदार व सौरव सरदार यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. केरळकडून एस. गोगुल व ए. एस. आनंद यांनी प्रत्येकी एक गोल केला. महाराष्ट्राच्या मुलांनी कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत पंजाबला ८-३ असे पराभूत केले. त्याचे श्रेय कर्णधार सारंग वैद्य याने केलेल्या चार गोलांना द्यावे लागेल. भाग्येश कुथे याने दोन गोल करीत त्याला चांगली साथ दिली.
डायव्हिंगमध्ये महाराष्ट्राच्या मुलींना सांघिक विजेतेपद
महाराष्ट्राच्या मुलींनी डायव्हिंगमध्ये तीनही विभागांत सांघिक विजेतेपद मिळवीत कौतुकास्पद कामगिरी केली. त्यांनी १६ ते १८ वर्षे गटात २६ गुण मिळविले, तर १४ व १५ वर्षे गटांत त्यांना १८ गुणांची कमाई झाली. १२ व १३ वर्षे गटात त्यांनी २७ गुण मिळविले. मुलांच्या तीनही विभागांत सेनादल क्रीडा मंडळाने सांघिक अजिंक्यपद पटकाविले. त्यांनी १६ ते १८ वर्षे गटात ३५ गुण मिळविले, तर १४ व १५ वर्षे गटांत त्यांना ३६ गुणांची कमाई झाली. १२ व १३ वर्षे गटात त्यांनी ३६ गुण मिळविले. पारितोषिक वितरण विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भारतीय जलतरण महासंघाचे अध्यक्ष दिगंबर कामत यांच्या हस्ते झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा