Ranji Trophy Final VID vs KER Updates in Marathi: भारताचा वादळी फलंदाजी करणारा फलंदाज करूण नायरने आपल्या शानदार फॉर्मने धावांचा पाऊस पाडला आहे. करूण नायर गेल्या बऱ्याच महिन्यांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतकं झळकावणाऱ्या विदर्भचा कर्णधार करुण नायरने रणजी ट्रॉफीमध्येही हाच फॉर्म कायम ठेवत अंतिम सामन्यात शानदार शतक झळकावले. केरळविरुद्धच्या या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात शतक हुकलेल्या नायरने दुसऱ्या डावात त्याची भरपाई केली.
नागपुरात खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी २०२४-२५ हंगामातील विजेतेपद सामन्याच्या चौथ्या दिवशी विदर्भाने दुसऱ्या डावात फलंदाजीला सुरुवात केली. पहिल्या डावात या संघाला केरळवर ३७ धावांची आघाडी मिळाली होती, पण दुसऱ्या डावात त्यांची सुरुवात खूपच खराब झाली. केरळने अवघ्या ७ धावांत २ विकेट गमावल्या होत्या. विदर्भाचा डाव अडचणीत आल्याचे दिसत होते आणि अशा परिस्थितीत पहिल्या डावातील दोन हिरो दानिश मलेवार आणि करूण नायर यांनी संघाची धुरा सांभाळली.
दानिश मलेवार आणि करूण नायर यांनी मिळून १८२ धावांची भागीदारी केली. दानिशने पहिल्या डावात शतक झळकावले होते, तर यावेळी तो ७३ धावा करून बाद झाला. दुसरीकडे पहिल्या डावात ८६ धावा करणाऱ्या नायरने यावेळी आपले शतक पूर्ण केले. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणाऱ्या या स्टार फलंदाजाने या मोसमातील चौथे आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील २३वे शतक १८४ चेंडूत झळकावले. या देशांतर्गत हंगामात करुणने नवव्यांदा शतक ठोकले आहे.
९९ धावांवर खेळत असलेल्या करूण नायरने एक धाव घेत आपले शतक पूर्ण केले. करूणने शतक पूर्ण होताच हेल्मेट काढून बॅट उंचावत आपल्या शतकाचा आनंद साजरा केला. यानंतर त्याने बॅट आणि हेल्मेट खाली ठेवत बोटांनी नऊचा आकडा दाखवला. करूणचे हे एका देशांतर्गंत हंगामातील नववे शतक आहे. हेच नववे शतक पूर्ण झाले असल्याचे त्याने दाखवले. जणू काही तो भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीला संदेश देत असल्याचे त्याच्या या सेलिब्रेशनवरून वाटत होते.
? for Karun Nair ?
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 1, 2025
A splendid knock on the big stage under pressure ?
It's his 9⃣th 1⃣0⃣0⃣ in all formats combined this season, and the celebration says it all??#RanjiTrophy | @IDFCFIRSTBank | #Final
Scorecard ▶️ https://t.co/up5GVaflpp pic.twitter.com/9MvZSHKKMY
नायरच्या या शतकाने विदर्भाला २५० हून अधिक धावांची आघाडी मिळवून दिली आणि संघाची ट्रॉफीवरील पकड मजबूत केली. विशेष म्हणजे दीड वर्षांपूर्वी नायरची केरळकडून खेळण्याची इच्छा होती. मूळचा कर्नाटककडून खेळणाऱ्या नायरला २०२३ च्या हंगामापूर्वी कर्नाटक संघातून वगळण्यात आले होते.
रणजी ट्रॉफीच्या फायनलपूर्वी नायरने खुलासा केला होता की त्याला कर्नाटकच्या संघाचून वगळल्यानंतर त्याने केरळकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि केरळ क्रिकेट असोसिएशनला प्रस्तावही दिला होता, पण पुढे काही घडलं नाही. त्यामुळे ते विदर्भाकडून क्रिकेट खेळण्यासाठी वळला आणि आता त्याने केरळविरूद्धच अंतिम फेरीत शतक झळकावत आपला क्लास दाखवून दिला आहे.