Karun Nair Inning in Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकामागून एक शतक झळकावणाऱ्या करूण नायरची बॅट सेमीफायनलमध्येही चांगलीच तळपली. महाराष्ट्रविरूद्धच्या सेमीफायनलमध्ये विदर्भाच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करक धावांचा डोंगर उभारला. विदर्भने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद ३८० धावा धावफलकावर जोडल्या. या सामन्यात करूण नायरने महाराष्ट्राच्या गोलंदाजांना सळो कि पळो करून सोडलं.
करुण नायरने महाराष्ट्राविरुद्ध ४४ चेंडूत ८८ धावांची नाबाद खेळी केली. करुण नायर ज्या आक्रमक पद्धतीने फलंदाजी करत होता ते पाहता तो सलग पाचवे शतक झळकावेल असे वाटत होते पण तसं झालं नाही. तोपर्यंत संघाचा पहिला डाव संपला होता. करूणने अखेरच्या दोन षटकांत चौकार-षटकारांचा पाऊस पाडत ३६ धावा केल्या. तर विदर्भाचे सलामीवीर यश राठोड आणि ध्रुव शौरे हे दोघेही ३४.४ षटके खेळले आणि त्यांनी दणदणीत शतकं झळकावली. यानंतर कमी चेंडू मिळूनही करूणने झंझावाती अर्धशतक झळकावले आणि संघाने ३८० धावांपर्यंत मजल मारली. याशिवाय जितेश शर्माने देखील झटपट अर्धशतक झळकावत करूणला साथ दिली.
डावाच्या शेवटच्या षटकात करुण नायरने वादळी फटकेबाजी केली. रजनीश गुरबानीने टाकलेल्या शेवटच्या षटकात करुणने एकूण २४ धावा दिल्या. विदर्भाच्या फलंदाजाने षटकाची सुरुवात जोरदार चौकार मारून केली. पुढच्या चेंडूवर एकही धाव न घेता करुणने तिसरा चेंडू थेट स्टेडिमयमध्ये पाठवला. षटकाच्या चौथ्या आणि पाचव्या चेंडूवरही तो शानदार चौकार मारण्यात यशस्वी ठरला. तर करुणने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत संघाची धावसंख्या ३८० वर नेली.
करुण नायर विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. या खेळाडूने आतापर्यंत ७५२ धावा केल्या आहेत. मोठी गोष्ट म्हणजे या स्पर्धेत त्याने एकूण ५ शतकं झळकावली आहेत. गेल्या ७ डावात त्याने ७ वेळा पन्नास अधिक धावांचा आकडा गाठला. याशिवाय गेल्या ७ डावांमध्ये तो एकदाच बाद झाला आहे.
हेही वाचा – IND vs ENG: पाकिस्तान वंशाच्या इंग्लंड खेळाडूला भारत व्हिसा नाकारला, भारत दौऱ्यात खेळू शकणार?
विजय हजारे ट्रॉफीमधील करूण नायरची कामगिरी
विदर्भ वि जम्मू काश्मीर – १२२ नाबाद
विदर्भ वि. छत्तीसगढ – ४४ नाबाद
विदर्भ वि. चंदीगढ – १६३ नाबाद
विदर्भ वि. तमिळनाडू – १११ नाबाद
विदर्भ वि. उत्तरप्रदेश – ११ धावा
विदर्भ वि. राजस्थान – १२२ नाबाद
विदर्भ वि. महाराष्ट्र (सेमी) – ८८ नाबाद