बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जयदेव उनाडकटची भारतीय संघात निवड झाल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले. मोहम्मद शमीच्या दुखापतीनंतर उनाडकटचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्या निवडीमुळे अनेक खेळाडूंना पुनरागमन करण्याची प्रेरणा मिळाली आहे. भारतासाठी त्रिशतक झळकावणारा करुण नायर त्यापैकीच एक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणाऱ्या या फलंदाजाला आता कर्नाटक संघाच्या रणजी संघातूनही वगळण्यात आले आहे. त्यानंतर त्याचे एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे.
करुन नायरने एक भावनिक ट्विट केले आहे. नायरने लिहिले, “प्रिय क्रिकेट कृपया मला आणखी एक संधी द्या.” त्याच्या या ट्विटने अनेक चाहते देखील भावूक झाले आहेत. नायरच्या या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. त्याने ८५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४८.९४च्या सरासरीने ५९२२ धावा केल्या आहेत. यादरम्यान नायरने १५ शतके आणि २७ अर्धशतके झळकावली आहेत.
इंग्लंडविरुद्ध झळकावले होते त्रिशतक –
देशांतर्गत क्रिकेटमध्ये नायरचे नाव चमकले आहे. याच कारणामुळे त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. नायरने निवडकर्त्यांना निराश केले नाही. डिसेंबर २०१६ मध्ये चेन्नई येथे त्याने इंग्लंडविरुद्ध नाबाद ३०३ धावांची खेळी केली होती. कसोटीत त्रिशतक झळकावणारा, तो वीरेंद्र सेहवागनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. नायर अचानक स्टार झाला, पण नशिबाने त्याला फार काळ साथ दिली नाही.
केवळ सहा कसोटींमध्ये मिळाली संधी –
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब कामगिरीनंतर मार्च २०१७ मध्ये नायरला संघातून वगळण्यात आले होते. तेव्हापासून त्याला कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. नायरने २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध दोन एकदिवसीय सामनेही खेळले होते. त्याने सहा कसोटीत ६२.३३ च्या सरासरीने ३७४ धावा केल्या आहेत. यादरम्यान एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. त्याच्या दोन वनडेत ४६ धावा आहेत.
आता देशांतर्गत संघातही स्थान नाही –
नायरला संघातून अचानक का वगळण्यात आले, हे त्याला कधीच सांगण्यात आले नाही. काही डावात अपयशी ठरल्यानंतरही अनेक खेळाडूंना सतत संधी मिळाल्या, पण नायरच्या बाबतीत असे घडले नाही. तेव्हापासून तो कर्नाटक देशांतर्गत संघाचा प्रमुख सदस्य आहे. मात्र, आता तसे झाले नाही. पहिल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याची निवड झाली नव्हती. आता शनिवारी झालेल्या पहिल्या दोन रणजी सामन्यांसाठीही त्याला संघात ठेवण्यात आले नाही. दुर्लक्षित झाल्यानंतर नायर यांच्या वेदना बाहेर आल्या आहेत.