लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या परुपल्ली कश्यपची जागतिक बॅडमिंटन क्रमवारीच्या पुरुष विभागातील अव्वल दहा स्थानावरून घसरण झाली आहे. याचप्रमाणे जागतिक बॅडमिंटन महासंघाने प्रकाशित केलेल्या ताज्या क्रमवारीत पी. व्ही. सिंधूने दोन स्थानांनी आगेकूच करीत कारकीर्दीतील सर्वोत्तम अशा १३व्या स्थानावर मजल मारली आहे.
गेल्या आठवडय़ात कश्यपने कारकीर्दीमधील सर्वोत्तम कामगिरी बजावताना जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर मजल मारली होती. परंतु नुकत्याच झालेल्या भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पध्रेत कश्यप पहिल्याच फेरीत पराभूत झाला. त्यामुळे हैदराबादचा हा गुणी खेळाडू ११व्या स्थानावर फेकला गेला. त्या स्पध्रेत मुंबईच्या अजय जयरामने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. जयरामने २७व्या, आर एम व्ही गुरुसाइदत्तने २८व्या तर मध्य प्रदेशच्या सौरभ वर्माने ३५व्या स्थानावर मजल मारली आहे. याचप्रमाणे आनंद पवारने ४२वे तर बी. साई प्रणीतने ४७वे स्थान गाठले आहे.

Story img Loader