सईद मोदी आंतरराष्ट्रीय ग्रां.प्रि. स्पध्रेत जेतेपद मिळविण्याची किमया साधणारा भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यपने जागतिक क्रमवारीतही दमदार भरारी घेतली आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाकडून प्रकाशित झालेल्या ताज्या क्रमवारीत कश्यपने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम असे १४वे स्थाने गाठण्यात यश प्राप्त केले आहे.
लखनौमध्ये झालेल्या मोदी आंतरराष्ट्रीय स्पध्रेला बॅडमिंटन क्षेत्रात तिसरा दर्जा दिला जातो. २६ वर्षीय कश्यपने प्रथमच हे जेतेपद मिळवून सर्वाचेच लक्ष वेधून घेतले.
याच स्पध्रेच्या महिला एकेरी गटात अंतिम फेरीत पराभूत झालेल्या पी. व्ही. सिंधूनेही जागतिक क्रमवारीत कारकीर्दीतील सर्वोत्तम भरारी घेतली आहे. सिंधूने पाच स्थांनानी आघाडी घेत १९व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे.
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकजिंकण्याची किमया साधणारी भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने वादग्रस्त पद्धतीने मोदी बॅडमिंटन स्पध्रेतून माघार घेतली होती. ती सध्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. लि झुरूई आणि वांग यिहान या दोन चिनी महिला क्रमवारीतील पहिल्या दोन स्थानांवर विराजमान आहेत. पुरुषांच्या क्रमवारीत मलेशियाचा ली चाँग पहिल्या तर चीनचा चेन लाँग दुसऱ्या स्थानावर आहे.
‘‘पुढील वर्षी ऑल इंग्लंड आणि विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावणे, हे माझे मुख्य लक्ष्य आहे. याचप्रमाणे सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेचे जेतेपद गाठणे, हे माझे स्वप्न आहे. त्यामुळे पुढील वर्षांसाठी हाच माझा संकल्प आहे!’’