भारताच्या पारुपल्ली कश्यपने आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुषांच्या एकेरीत विजयी सलामी केली. मात्र राष्ट्रकुल रौप्यपदक विजेत्या ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांना पहिल्याच फेरीत पराभवास सामोरे जावे लागले.
राष्ट्रकुल रौप्यपदक विजेता कश्यपने सिंगापूरच्या झेई लियांग डेरेकचा २१-१७, २१-१३ असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला. हा सामना त्याने केवळ ३९ मिनिटांमध्ये जिंकला. २८ वर्षीय कश्यपला पुढच्या फेरीत चीन तैपेई संघाच्या याचिंग हिसु याच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. कश्यपने हिसू याच्याविरुद्ध आतापर्यंत दोन वेळा विजय मिळविला आहे. यंदा त्याने इंडिया ओपन स्पर्धेत त्याला हरविले होते.
कश्यपने डेरेकविरुद्ध पहिल्या गेममध्ये ४-१ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर ९-९ अशा बरोबरीपर्यंत डेरेकने कश्यपला चांगली झुंज दिली. मात्र त्यानंतर कश्यपने खेळावर नियंत्रण ठेवीत पहिली गेम घेतली. दुसऱ्या गेममध्येही कश्यपने ड्रॉपशॉट्स व अचूक प्लेसिंग असा खेळ करीत ही गेम सहज घेत सामना जिंकला.
यंदा निराशाजनक कामगिरी करणाऱ्या ज्वाला व अश्विनी यांच्यावर या स्पर्धेतही पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची नामुष्की स्वीकारावी लागली. त्यांना चीन तैपेई देशाच्या युओ पोपेई व याचिंग हिसुई यांनी २१-१७, १५-२१, २१-१५ असे हरविले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा