सलामीवीर कथन पटेलचे शानदार शतक आणि धुव्र पटेलने साकरलेल्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर गुजरातने रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेत विदर्भा विरुद्ध पहिल्या दिवसअखेर सहा बाद २६३ धावा केल्या.
सिव्हील लाईन्स येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मदानावर सुरू असलेल्या या सामन्यात गुजरातला झटपट दोन धक्के मिळाले. सामन्याच्या पहिल्याच षटकात रजीनीश गुरबानीने कर्णधार पी. के. पंचाल याला शून्यावर बाद केले. ललित यादवने बी. मीराईला बाद करून गुजरातच्या अडचणीत भर टाकली.
केवळ १६ धावांवर गुजरातचे दोन फलंदाज तंबूत रवाना झाले असताना सलामीवीर कथन आणि आर. भटने संयमी खेळी साकारत गुजरातला पन्नास धावांचा पल्ला गाठून दिला.
कथनने विदर्भाच्या गोलंदाजाचा चोख प्रत्युत्तर दिले. मात्र ३२ धावांवर भटला फिरकीपटू अक्षय वखरेने पायचीत केले आणि गुजरातला तिसरा धक्का दिला. त्यानंतर एम. सी. जुनेजाला एका धावेवर आदित्य सरवटेने पायचीत केले. त्यानंतर धुव रावल आणि कथनने गुजरातला दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला.
दरम्यान, सलामीवीर कथनने आपले शानदार शतक पूर्ण केले.मात्र लगेचच अक्षय कर्णेवारने कथनला झेल बाद करुन त्याची खेळी संपुष्टात आणली.
कथनने १५ चौकारांच्या मदतीने १०५ धावा केल्या. मधल्या फळीतील धुव्रने सावध फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले. गुजरातने पहिल्या दिवस अखेर सहा बाद २६३ धावा केल्या.धुव्र रावल नाबाद ६९ तर करण पटेल २७ धावांवर खेळत आहेत.
संक्षिप्त धावफलक
गुजरात (पहिला डाव) ६ बाद २६३ (धुव्र रावल ६९,कथन पटेल १०५; आदित्य सरवटे २/५७)