इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार जो रूट सध्या अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. रुटने कर्णधारपद सोडल्यानंतर सलग दोन सामन्यांत दोन शतके झळकावली आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्रेंट ब्रिज कसोटीतही त्याने १७६ धावांची शानदार खेळी खेळली. दुसऱ्या कसोटी सामन्यातील रुटचे शतक सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. रूटने शतक पूर्ण केले तेव्हा इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघातील काही खेळाडूही स्टेडियममध्ये सामना बघत होत्या. त्यांनी अनोख्या पद्धतीने रूटच्या शतकाचा आनंद साजरा केला.

इंग्लंडच्या क्रिकेट चाहत्यांच्या ‘बार्मी आर्मी’ या ट्विटर अकाऊंटने महिला क्रिकेटपटू कॅथरीन ब्रंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो रूटने शतक केल्यानंतर कॅथरिनने विशिष्ट पद्धतीने आपली कंबर हलवून आनंद साजरा केला. ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कॅथरीन पहिल्यांदा तिच्या सहकारी खेळाडूंसोबत मस्ती करताना दिसत आहे. रूटने शतक केल्यानंतर तीने कॅमेऱ्यासमोर ट्वर्क केले. नॅट स्कायव्हर आणि इंग्लंडची माजी क्रिकेटपटू ईशा गुहा कॅथरीनचा डान्स पाहून थक्क झाल्या.

कॅथरीनने नुकतेच तिची सहकारी नॅट स्कायव्हरशी लग्न केले. दोघींचा हा समलिंगी विवाह सोहळा क्रिकेट जगतात चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर आता कॅथरीन आपल्या व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

Story img Loader