* पहिल्या दिवसावर भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व
* क्लार्कची झुंजार ९१ धावांची खेळी
* भुवनेश्वर कुमार व रवींद्र जडेजाचे प्रत्येकी तीन बळी
‘काय पो छे’.. हाच विजयी आविर्भाव दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारतीय संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यावर होता. ‘पाहा, मी तुझी पतंग कापली’ अशा आशयाची ही गुजराती म्हण. चेतन भगतच्या ‘दी थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’ या गाजलेल्या पुस्तकावरील हा हिंदी चित्रपट सध्या चांगलाच गल्ला करीत आहे. ही कथा आहे तीन मित्रांची. शनिवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मर्दुमकी गाजवली ती भारताच्या तीन गोलंदाजांनी. भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा आणि हरभजन सिंग यांनी आपल्या लाजवाब गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सहजगत्या गुंडाळला. त्यामुळेच पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व सिद्ध झाले. अपवाद फक्त ऑसी संघनायक मायकेल क्लार्कचा. चेन्नईत शतक झळकावणारा हा उमदा फलंदाज सलग दुसऱ्या शतकापासून फक्त ९ धावांच्या अंतरावर असताना माघारी परतला.
पहिल्या दिवसाचे शास्त्रीय पृथक्करण केल्यास पहिल्या आणि तिसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी निभ्रेळ यश मिळवले. त्यामुळे ९ बाद २३७ अशी ऑस्ट्रेलियाची अवस्था झाली असताना क्लार्कने डाव घोषित करण्याचा निर्णय घेऊन सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला, पण उर्वरित तीन षटकांत भारतीय सलामीवीरांना तंबूची वाट दाखवून रात्री सुखासमाधानाची झोप घेण्याचे त्याचे मनसुबे असावे, पण वीरेंद्र सेहवाग (४) आणि मुरली विजय (०) यांनी ही षटके निर्धाराने खेळून काढत क्लार्कचा विश्वास खोटा ठरविला.
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीला सकाळी हादरे दिले, तर चहापानानंतर रवींद्र जडेजा आणि हरभजन सिंग यांनी आपल्या फिरकीची जादू दाखवली. त्यामुळे ४ बाद २०८ अशा सुस्थितीनंतर ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी उडाली. त्यांचे तळाचे पाच फलंदाज फक्त २८ धावांत माघारी परतल्यामुळे पाहुण्यांची ९ बाद २३७ अशी अवस्था झाली. जडेजाने अप्रतिम गोलंदाजी करीत ३३ धावांत ३ बळी घेतले, तर भुवनेश्वर कुमारने ५३ धावांत ३ बळी घेतले. हरभजनने ५२ धावांत २ बळी घेतले.
चेन्नईच्या पहिल्या कसोटी सामन्यात फिरकीला पूर्णत: अनुकूल खेळपट्टीवर क्लार्कने भारतीय फिरकी त्रिकुटाचा शर्थीने सामना करीत शतक साकारले होते. त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा क्लार्कचा इरादा होता, परंतु कसोटी कारकिर्दीतील २४वे शतक साकारण्यात तो अपयशी ठरला. समोरून एकेक फलंदाज धारातीर्थी पडत असताना क्लार्कचा संयम ढळला आणि ९१ धावांवर तो माघारी परतला. डावखुरा फिरकी गोलंदाज जडेजाला स्वीपचा फटका खेळण्याच्या नादात क्लार्कचा त्रिफळा उद्ध्वस्त झाला. त्याने १८६ चेंडू किल्ला लढवत नऊ चौकार आणि एका षटकारासह आपली दिमाखदार खेळी साकारली.
सकाळच्या सत्रात दीड तासांतच भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलियाची ४ बाद ६३ अशी केविलवाणी अवस्था केली होती. तेव्हा क्लार्कने यष्टिरक्षक-फलंदाज मॅथ्यू वेडच्या (६२) साथीने पाचव्या विकेटसाठी १४५ धावांची भक्कम भागीदारी रचून संघाला द्विशतकापार नेले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येचे श्रेय वेड यालासुद्धा जाते. सकाळी नाणेफेकीचा कौल होईपर्यंत वेड दुखापतीमुळे खेळू शकणार नाही आणि फिलिप ह्युजेसकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपवली जाणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती, परंतु ऑस्ट्रेलियाच्या अंतिम संघात वेडचे स्थान होते. त्याने १४४ चेंडूंत आठ चौकारांच्या साहाय्याने ६२ धावांची खेळी उभारली आणि विशेष म्हणजे आपल्या कप्तानाला चांगली साथ दिली.
‘‘पहिल्या तासाभराच्या खेळात नेहमीच काही तरी घडते. त्यामुळे मी यष्टीच्या दिशेनेच मारा ठेवला. खेळपट्टी धिमी असल्यामुळे चेंडू खाली राहात होता. त्यामुळे योजनापूर्वक गोलंदाजीकडे मी लक्ष केंद्रित केले. भारतीय खेळपट्टय़ांवर फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व असते, हे आपल्या सर्वानाच ज्ञात आहे. त्यामुळे मध्यमगती गोलंदाजांना किमान दोन जरी बळी मिळत असतील, तर ते चांगले म्हणायला हवे.’’
-भुवनेश्वर कुमार, भारताचा मध्यमगती गोलंदाज
‘‘चेन्नईच्या खेळपट्टीपेक्षा ही पूर्णत: निराळी आहे. पहिल्या डावातील आघाडी या सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. आमची गोलंदाजी रविवारी चांगली झाली तर भारताला २३० धावांत आम्ही रोखू शकू. ऑस्ट्रेलियाचा डाव घोषित करण्याचा निर्णय हा शनिवारी सायंकाळीच काही बळी मिळविण्याच्या हेतूपोटी होता. खेळपट्टीवर चेंडू उसळी मारत होते. याचाच फायदा घेण्याचे आमचे
ध्येय होते.’’
-मॅथ्यू वेड, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज-यष्टिरक्षक
पहिल्या दिवसअखेर
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ९ बाद २३७ (डाव घोषित)
भारत (पहिला डाव) : बिन बाद ५
सत्र धावा/बळी
पहिले सत्र ८३/४
दुसरे सत्र १०४/०
तिसरे सत्र ५५/५
धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : डेव्हिड वॉर्नर त्रिफळा गो. कुमार ६, ईडी कोवान पायचीत गो. कुमार ४, फिल ह्युजेस झे. धोनी गो. अश्विन १९, शेन वॉटसन पायचीत गो. कुमार २३, मायकेल क्लार्क त्रिफळा गो. जडेजा ९१, मॅथ्यू वेड झे. कुमार गो. हरभजन ६२, मोझेस हेन्रिक्स त्रिफळा गो. जडेजा ५, ग्लेन मॅक्सवेल झे. धोनी गो. जडेजा १३, पीटर सिडल पायचीत गो. हरभजन ०, जेम्स पॅटिन्सन नाबाद १, झेव्हियर डोहर्टी नाबाद ०, अवांतर (बाइज ९, लेगबाइज ४) १३, एकूण ८५ षटकांत ९ बाद २३७ (डाव घोषित)
बाद क्रम : १-१०, २-१५, ३-५७, ४-६३, ५-२०८, ६-२१७, ७-२३३, ८-२३६, ९-२३६
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १५-२-५३-३, इशांत शर्मा १७-५-४५-०, आर. अश्विन १५-६-४१-१, हरभजन सिंग २२-२-५२-२, रवींद्र जडेजा १६-४-३३-३
भारत (पहिला डाव) : मुरली विजय खेळत आहे ०, वीरेंद्र सेहवाग खेळत आहे ४, अवांतर (वाइड १) १, एकूण ३ षटकांत बिनबाद ५
गोलंदाजी : जेम्स पॅटिन्सन २-१-१-०, पीटर सिडल १-०-४-०
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा