केदार देवधर याने केलेल्या नाबाद शतकामुळेच महाराष्ट्रविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात शनिवारी पहिल्या डावात ३ बाद २५६ अशी शानदार सुरुवात केली. गहुंजे येथील क्रिकेट स्टेडियमवर आजपासून सुरू झालेल्या या सामन्यातील पहिला तास वगळता संपूर्ण खेळांत बडोद्याच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजविले. देवधर याचे नाबाद शतक हेच बडोद्याच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. त्याने जबाबदारीने खेळ करीत शतक टोलवित नाबाद १०४ धावा केल्या. त्याने १७० चेंडूंमध्ये बारा चौकारही मारले. प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधील त्याचे हे दुसरेच शतक आहे. देवधर याने आदित्य वाघमोडे याच्या साथीत अखंडित शतकी भागीदारी केली. वाघमोडे याने २३८ चेंडूंमध्ये नाबाद ८७ धावा करताना दहा चौकार मारले. वाघमोडे याने सौरभ वाकसकर याच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. वाकसकर याने १०९ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या. बडोद्याने पहिले दोन गडी लवकर गमावले. त्यावेळी खेळांवर नियंत्रण मिळविण्याची संधी महाराष्ट्राला मिळाली होती, मात्र बडोद्याच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजांवर प्रभुत्व गाजविले.  
महाराष्ट्राकडून मध्यमगती गोलंदाज श्रीकांत मुंढे याने ४५ धावांमध्ये दोन गडी बाद केले. तर अक्षय दरेकर याने एक बळी मिळविला.